रेवा : मध्य प्रदेश राज्याच्या रेवा जिल्ह्याचे मुख्य ठाणे व भूतपूर्व रेवा संस्थानची राजधानी. लोकसंख्या १,००,५१९ (१९८१). हे सटणा लोहमार्ग स्थानकाच्या पूर्वेस ५० किमी. व वाराणसी-कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर वसलेले असून राष्ट्रीय महामार्ग क्र. २७ ने हे शहर अलाहाबादशीही जोडलेले आहे.

प्राचीन अधिराज अथवा कारुष देश म्हणजे रेवा प्रदेश असावा असे म्हणतात. तेराव्या शतकात रेवा बाघेल राजपूत घराण्याच्या आधिपत्याखाली होते. त्यानंतर सम्राट शेरशाहचा मुलगा जलालखान याने १५५४ मध्ये ते घेतले. १५९७ मध्ये सम्राट अकबराने बांधोगढ काबीज केल्याने बाघेलांनी आपली राजधानी रेवा येथे हलविली. पुढे राजा विक्रमादित्याने शहरातील इमारती व राजवाडे यांची डागडुजी करून शहराचा विस्तार केला (१६१८). १७३१ च्या सुमारास पन्नाचा राजा हिर्डेशाह याने शहराची नासधूस व लूट केली. १९४८ मध्ये रेवा शहराचा विंध्य प्रदेशात व त्यानंतर मध्य प्रदेश राज्यात समावेश झाला.

जुन्या शहराभोवती ६ मी. उंचीची तटबंदी असून, पूर्वेस ऐतिहासिक ‘झूला दरवाजा’ हे प्रवेशद्वार आहे. शहरातील प्रासाद व संस्थानी काळातील वास्तू उल्लेखनीय असून येथील ‘लक्ष्मणबाग’ तसेच वैष्णव संप्रदायाची अनेक मंदिरे प्रेक्षणीय आहेत. संस्थानी काळात या शहराची शैक्षणिक-सांस्कृतिक दृष्टीने प्रगती झाली. शहराच्या ईशान्येस ३ किमी. अंतरावर मध्य प्रदेश शासनाने सु. १३४ हेक्टर क्षेत्रामध्ये औद्योगिक वसाहत उभारली असून, त्यामुळे शहराचा औद्योगिक विकास बराच झाला आहे. रेवा ही अन्नधान्याची प्रमुख बाजारपेठ असून येथे लाकूड, इमारती दगड इत्यादींचाही व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो. त्याशिवाय शहरात हातमाग कापड, विणकाम, लाकडावरील कोरीवकाम इ. उद्योग चालतात. येथे अवदेश प्रताप सिंग विद्यापीठ (स्था. १९६८) असून इतरही शैक्षणिक सुविधा आहेत. शहराच्या आसमंतात गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, तेलबिया इ. पिकांचे उत्पादन होते. जवळच असलेले बांधोगढ अभयारण्य पांढऱ्या वाघांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. 

देशपांडे, सु. चिं.