ओक्लाहोमा सिटी : अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्याची राजधानी. लोकसंख्या ३,६८,३७७ (१९७०). हे नॉर्थ कानेडियन नदीच्या तीरावर वसले असून व्यापार, उद्योग व दळणवळणाचे मोठे केंद्र आहे. ह्याच्या आसमंतात खनिज तेलाच्या विहीरी असून तेलशुद्धीकरण, खनिकर्मयंत्रे, छपाई, आटा, कपडे, मांससंवेष्टन. लोखंड व पोलाद, मोटारींचे व विमानांचे सुटे भाग, दूरध्वनियंत्रे, फर्निचर, खेळांचे साहित्य वगैरे अनेक उद्योग येथे आहेत. विद्यापीठ, वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय संशोधन संस्था, विधी महाविद्यालय ह्या येथील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था होत. यांशिवाय येथे अनेक उद्याने , सिंफनी ऑर्केस्ट्रा, ग्रंथालय, इतिहास वस्तुसंग्रहालय व भव्य प्रेक्षागृह आहे. शहराच्या हद्दीत सु. १,०००वर तेलविहीरी आहेत.

लिमये, दि. ह.