होशियारपूर : पंजाब राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय. लोकसंख्या १,८९,३७१ (२०११). हे जलंदरच्या ईशान्येस सु. ३९ किमी., शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी, बीस्त-जलंदर दुआब क्षेत्रात, स.स.पासून २९६ मी. उंचीवर वसलेले आहे. हे रस्ते व लोहमार्गाने इतर शहरांशी जोडलेले आहे. यास हिमालयाचे प्रवेशद्वार म्हणतात. होशियारपूर चौथ्या शतकाच्या प्रारंभी वसविण्यात आले, असे संशोधक मानतात. रणजितसिंगाने हे १८०९ मध्ये जिंकले होते व येथे जलंदर दोआबच्या अधिकाऱ्याचे मुख्यालय स्थापिले होते. हे शहर लघू व कुटिरोद्योग आणि लाकडी व हस्तिदंताच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. येथे कापड, रेशीम, संगीत वाद्यनिर्मिती, रंगीबेरंगी प्लॅस्टिक फर्निचरनिर्मिती, तेलघाणे इ. उद्योग चालतात. आसमंतातील शेतमालाची ही प्रमुख बाजारपेठ आहे. 

 

हे एक शैक्षणिक केंद्र असून येथे स्वामी सर्वानंद गिरी पंजाब विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र, योगी गुरू रविदास आयुर्वेद विद्यापीठ, विश्वेश्वरनंद वेदिक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. भृगुसंहिता या भविष्यविषयक ग्रंथाभ्यासाचे हे केंद्र समजले जाते व भृगुसंहिते च्या येथील प्रती खऱ्या व प्रमाणित मानतात. शहरात महानगरपालिका आहे. येथील शिशमहाल, पुरातत्त्वीय संग्रहालय प्रसिद्ध आहे. 

पवार, मनीषा