सांगली शहर : महाराष्ट्र सांगली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २,५५,२७० (२०११). हे कृष्णा नदीच्या काठावर वसले असून कृष्णा-वारणा नद्यांचे संगमस्थान या शहराच्या नैर्ऋत्येस ४ किमी. वर आहे. कोल्हापूरपासून पूर्वईशान्येस ४८ किमी. तर मिरजपासून वायव्येस १० किमी.वर हे शहर आहे. ‘सहा गल्ली’ वरून या शहराला सांगली हे नाव पडले असावे. शहराचे जुने व नवे शहर असे दोन भाग आहेत. सांगली संस्थानचे अधिपती चिंतामणराव पटवर्धन यांनी एकोणिसाव्या शतकात नियोजनपूर्वक नवे शहर वसविले. यामध्ये पेठभाग, वखार भाग, शिवाजीनगर आणि विश्रामबागपर्यंतच्या भागाचा समावेश होतो. या भागातील रस्ते रुंद व स्वच्छ असून तेथे आधुनिक भव्य इमारती आणि सुंदर उद्याने-उपवने आहेत. बँका, व्यापारी कार्यालये, शाळा, दवाखाने व राज्यसरकारची काही प्रधान कार्यालये या भागात आहेत.

मध्ययुगीन काळात हा प्रदेश कुंडल या नावाने ओळखला जाई. सांप्रत कुंडल नावाचे एक लहानसे खेडे सांगली शहराजवळ आहे. इ.स. बाराव्या शतकात चालुक्य साम्राज्याचे कुंडल हे राजधानीचे ठिकाण होते. ब्रिटिश राजवटीत मुंबई इलाख्यातील कोल्हापूर-डेक्कन रेसिडेन्सीमधील सांगली संस्थानला ११ तोफांच्या सलामीचा मान होता. दक्षिणेतील मराठा जहागिरींपैकी ही एक होती. मराठा साम्राज्याचा सांगली हा एक भाग होता परंतु १८०१ पूर्वीचे या संदर्भातील प्रत्यक्ष संदर्भ आढळत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोगल साम्राज्याकडून सांगली, मिरज व सभोवतालच्या प्रदेशाचा ताबा मिळविला होता. इ. स. १८०१ पर्यंत सांगलीचा समावेश मिरज जहागिरीमध्ये केला जाई. चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांनी सांगली संस्थानची स्थापना केली व त्याच्या राजधानीचे ठिकाण सांगली येथे ठेवण्यात आले. १९०१ मध्ये सांगली नगराची लोकसंख्या १६,८२९ होती. ८ मार्च १९४८ रोजी सांगली संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले.

सांगली येथे १८७६ ते ८ फेब्रुवारी १९९८ पर्यंत नगरपालिका होती. ९ फेब्रुवारी १९९८ पासून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर मिळून महानगरपालिका अस्तित्वात आली. २०११ च्या जनगणनेनुसार या महापालिकेची एकूण लोकसंख्या ५,०२,६९७ असून त्यामध्ये २,५५,२७० पुरूष व २,४७,४०७ स्त्रिया होत्या. एकूण लोकसंख्येत सांगली शहर २,५५,२७० (२०११), मिरज १,४५,३३८, कुपवाड ६७,१३६ व वॉनलेसवाडी ६,२२८ (२००१) असे विभाजन आहे. एकूण क्षेत्रफळ ११८ चौ. किमी. असून प्रभागांची संख्या २४ आहे. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे जिल्हास्तरावरील केंद्र व राज्यस्तरावरील शासकीय, निमशासकीय व महामंडळांची कार्यालये येथे आहेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) प्रादेशिक कार्यालय सांगली येथे असून या कार्यालयामार्फत सांगली व सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसींची व्यवस्था पाहिली जाते. जागेच्या तुलनात्मक दृष्ट्या कमी किंमती, पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ व स्थावर संपदा यांची कमी किंमतीतील उपलब्धता यांमुळे सांगली व तिच्या परिसरात हळुहळू मोठ्या कंपन्या येत आहेत. येथील औद्योगिक वसाहत प्रसिद्घ आहे. विश्रामबाग भागात ‘सांगली इन्फोटेक पार्क’  विकसित केले असून त्यात २,६०० चौ. मी. जागा माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठी उपलब्ध झाली आहे. जास्तीच्या बांधकामासाठीही येथे आणखी भूखंड उपलब्ध आहेत. सांगली परिसरात बरेच साखर कारखाने आहेत. कापूस  पिंजण्याच्या व कापड विणण्याच्या गिरण्या येथे आहेत. वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने सांगलीला लाभलेल्या विशिष्ट स्थानामुळे हे महत्त्वपूर्ण व्यापारी केंद्र बनले असून येथील प्रामुख्याने कृषी उत्पादनांचा व्यापार मोठा आहे. हळदीची आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ येथे असल्याने या शहराला ‘हळदीचे शहर’ असे संबोधले जाते. येथील तेलबिया, गूळ, मिरची, तंबाखू, धान्य यांचा व्यापारही मोठा आहे. सांगलीला सहकार चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. मोठे व्यापारी केंद्र असल्यामुळे बहुतेक सर्व मुख्य बँकांच्या शाखा येथे आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील पेठ नाका व शिरोली नाका येथून सांगलीला जाता येते. सांगली हे लोहमार्ग स्थानक आहे.

शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्याही सांगली प्रसिद्घ आहे. कला वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, विधी, व्यवस्थापनशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुशिल्प, औषधनिर्माणशास्त्र, आयुर्वेदिक, वैद्यक, दंतविज्ञान, पर्यावरण विज्ञान इ. शाखांची महाविद्यालये सांगलीत आहेत. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, विलिंग्डन महाविद्यालय, चिंतामणराव पटवर्धन वाणिज्य महाविद्यालय, बी. टी. महाविद्यालय, एस्. टी. सी. महाविद्यालय ही उल्लेखनीय महाविद्यालये आहेत. शहरात करमणूकविषयक व सेवाभावी संस्था अनेक आहेत. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, तारांकित हॉटेले, मॉल, भव्य क्रिडागार, व्यायामशाळा, ग्रंथालये, दवाखाने, रूग्णालये इत्यादींची येथे उपलब्धता आहे. मराठी नाटकाचे हे उगमस्थान असल्याने सांगलीला ‘नाट्यपंढरी’ असे संबोधले जाते. मराठी संगीत व नाटकाचा शहराच्या सांस्कृतिक जीवनावर बराच परिणाम झालेला दिसून येतो. सांगलीचे अधिपती सर चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांनी राजाश्रय दिल्यामुळेच विष्णुदास भावे यांनी १८४३ साली लिहिलेल्या सीता स्वयंवर  या नाटकाचा प्रथम प्रयोग सांगली येथे झाला. प्रसिद्घ नाटककार गोविंद बल्लाळ देवल आणि कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे सांगलीचेच. येथे महापालिकेची दोन नाट्यगृहे आहेत. येथील नगर वाचनालय उल्लेखनीय आहे. आकाशवाणी केंद्रही येथे आहे. जानेवारी २००८ मध्ये येथे एक्क्याऐंशीवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

कृष्णा नदी, तिच्यावरील घाट व अनेक प्रेक्षणीय मंदिरे यांमुळे सांगलीला धार्मिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. शहरात गणपती मंदिर, गोमाता मंदिर, गीता मंदिर, पार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिर, रामटेकडी मंदिर, बालाजी मंदिर, कोदंडधारी राममंदिर, मुरलीधर मंदिर, हनुमान मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, द्वारकानाथ मंदिर, नदीकाठावरील विष्णुमंदिर व कृष्णाबाई मंदिर इ. मंदिरे तसेच गणेशदुर्ग किल्ला, पटेल चौकातील जुम्मा मशीद, पेठ भागातील मक्का मशीद इ. प्रेक्षणीय आहेत.

सांगलीतील गणपती मंदिर विशेष प्रसिद्घ असून पटवर्धन घराण्याची सत्ता असताना अप्पासाहेब पटवर्धन यांनी ह्या मंदिराचे काम हाती घेतले. प्रत्यक्षात हे मंदिर १८४४ मध्ये बांधून पूर्ण झाले. येथील मूर्ती हा शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरासाठी वापरण्यात आलेले मोठमोठे दगड ज्योतीबाच्या डोंगरातून आणले आहेत. अनेकांचे हे कुलदैवत असून दर वर्षी देशविदेशातील हजारो भाविक या मंदिरास भेट देतात. या प्रमुख मंदिराबरोबरच सूर्यनारायण, चिंतामणेश्वर, लक्ष्मीनारायण आणि चिंतामणेश्वरी ही छोटी मंदिरे येथे असून त्यांना एकत्रित मिळून गणपती पंचायतन असे म्हणतात. मंदिराच्या आवारात कमळाच्या आकाराची दोन कारंजी आहेत. येथे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत होणारा गणेश उत्सव मोठा असतो. शहरात पांजरपोळ संस्था असून तिची स्थापना अप्पासाहेब सखाराम राजमाने यांनी शके १८२६ (इ.स.१९०४) मध्ये केली आहे. या संस्थेतील गोमाता मंदिर उल्लेखनीय आहे. यामध्ये गायीला टेकून उभी असलेली कृष्णाची संगमरवरी मूर्ती एका कोपऱ्यात असून गोठ्याच्या भिंतीवर कृष्णाच्या जन्मापासूनच्या संपूर्ण जीवनकहाणीचा क्रमशः उल्लेख असलेली रंगीत तैलचित्रे आहेत. शहराच्या पेठ भागात टिळक मंदिर (गीता मंदिर) असून त्यात लोकमान्य टिळकांचा संगमरवरी अर्धपुतळा तसेच टिळकांच्या सन्मानार्थ सुरू करण्यात आलेले गीता मंदिर नावाचे वाचनालय आहे. वखार भागात पार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिर आहे. हे मंदिर १२ खांबांवर उभारलेले असून प्रत्येक खांब गरूडाकृतीचा आहे.

सांगलीतील गणेशदुर्ग हा अष्टकोनाकृती किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. किल्ल्याच्या भिंती ४·५७ मी. जाडीच्या व ५·१८ मी. उंचीच्या आहेत. यामध्ये तत्कालीन दिवाणखान्याची प्रशस्त इमारत आहे. किल्ल्याच्या परिसरात सध्या शासकीय कार्यालये, महाविद्यालय, माध्यमिक शाळा व वस्तुसंग्रहालय आहे. किल्ल्याच्या परिसरातील विलिंग्डन कॉलेज म्यूझीयम हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे वस्तुसंग्रहालय असून या इमारतीच्या प्रवेशद्वारावर अजिंठा, वेरूळ व कार्ला येथील शिल्पांची भव्य छायाचित्रे लावलेली आहेत. तसेच सांगली शहरातील कृष्णा नदीवरील पुलाची प्रतिकृती लाकडी कपाटात ठेवलेली आहे. या संग्रहालयात प्रसिद्घ चित्रकार ए. एन्. म्यूलर, जेम्स वेल्स व धुरंधर यांनी काढलेली मूळ तैलचित्रे, नाना फडणीसांचे तैलचित्र, बुद्घ, पीसाचा झुकता मनोरा, ज्यूलीअस सीझर व क्लीओपात्रा यांचे संगमरवरी पुतळे,  फुलदाण्या, चिनी मातीची भांडी इत्यादींचा समावेश आहे. १९५४ मध्ये हे वस्तुसंग्रहालय विलिंग्डन महाविद्यालयाने व्यवस्थापनासाठी ताब्यात घेतले. शहरात अनेक सार्वजनिक उद्याने असून त्यांपैकी प्रतापसिंह उद्यान हे १,४८१·२२ चौ. मी. क्षेत्रफळाचे प्रसिद्घ उद्यान असून त्याच्या मध्यभागी प्रतापसिंहांचा संगमरवरी अर्धपुतळा आहे. येथील आमराई बागही मोठी आहे. सांगली शहरातील तसेच परिसरातील अनेक सौंदर्यस्थळांमुळे सांगली हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनले आहे.

चौधरी, वसंत