काप्री : दक्षिण इटलीच्या नेपल्स  उपसागरामधील खडकाळ बेट. लोकवस्ती १०,५०० (१९६१).क्षेत्रफळ सु. १० चौ. किमी. सर्वाधिक उंची सु. ५९० मी. काप्री व आनाकाप्री ही दोन लहान शहरे बेटावर आहेत. नयनमोहर सृष्टिसौंदर्य, आल्हादकारक व निरोगी हवामान, हिरवीगार वनश्री इत्यांदीमुळे काप्री बेटावर हौशी प्रवाशांची नेहमी गर्दी असते व साहजिकच प्रवाशांच्या गरजा भागविणारे उद्योगधंदे भरभराटीत चालतात. पांढरे मद्य ही येथील मुख्य धनदायी निर्यात, येथे फळे होतात, तसेच ऑलिव्ह तेलाची निर्मिती होते. मासेमारी चालते. काप्रीच्या उंच व डोंगराळ किनाऱ्यावर अनेक प्रसिद्ध गुहा असून त्यांपैकी `दी ब्लू ग्रांट्टो’ ही विख्यात आहे. बेटावर पक्ष्यांसाठी एक अभयारण्याही आहे. रोमन सम्राट ऑगस्टस, टायबीअरियस यांच्या विलासगृहांचे व रोमन, नॉर्मन, मूर वास्तूकलेचे अनेक अवशेष काप्रीत सर्वत्र आढळतात.

ओक, द. ह.