फोर्ट विल्यम–१ : कॅनडाच्या आँटॅरिओ प्रांतातील १९७० पर्यंतचे शहर. लोकसंख्या ४८,२०८ (१९६६). १९७० मध्ये फोर्ट विल्यम, पोर्ट आर्थर व इतर दोन नगरांचे मिळून ‘थंडर बे’ (लोक. १,१९,२५३–१९७६) हे एकच मोठे शहर करण्यात आले. फोर्ट विल्यम डलूथच्या ईशान्येस ३२० किमी. सुपीरिअर सरोवराकाठी कमिनिस्टिक्वीया नदीमुखाशी वसले आहे. याच्या उत्तरेस ६ किमी. अंतरावर पोर्ट आर्थर हे बंदर आहे. दळणवळण व व्यापार यांचे हे केंद्र असून याचा परिसर सोने, चांदी व तांबे यांच्या खाणींनी समृद्ध आहे. धान्य साठवणाच्या सोयींबाबत हे विख्यात आहे.

प्येर एस्प्री राडीसाँ व स्यर द ग्रोझेये हे फ्रेंच समन्वेषक १६५५ मध्ये या प्रदेशात आले. १६७८ च्या सुमारास हे फ्रेंचांनी लोकर व्यापाराचे प्रमुख केंद्र बनविले आणि कमिनिस्टिक्वीया हा किल्ला येथे बांधला (१७१७). मात्र माकेंझी रॉडरिक याने येथील किल्ल्याची पुनर्रचना करेपर्यंत (१७९८) येथील लोकसंख्या विरळच होती. ‘नॉर्थवेस्ट फर ट्रेडिंग कंपनी’ने १८०२ मध्ये त्याचा ताबा घेतला व कंपनीचा मुख्य व्यवस्थापक मागिलिव्हस विल्यम याच्या नावावरून यास ‘फोर्ट विल्यम’ असे नाव देण्यात आले (१८०७). १९०७ मध्ये यास शहराचा दर्जा मिळाला. लोकर उद्योगाप्रमाणेच कागद उद्योग हा येथील प्रमुख व्यवसाय असून येथे विमानांचे सुटे भाग, लाकूडकाम, अवजड वाहने इ. उद्योगांचाही विकास झालेला आहे. सरोवरे, टेकड्या, शिकारीसाठी उपयुक्त अशी जंगले इत्यादींमुळे याचा परिसर निसर्गरम्य झालेला आहे; त्यामुळे पर्यटकांचे ते आकर्षण ठरले आहे.

ओक, द. ह.