ओरेनबुर्ग : (च्कालफ). रशियातील त्याच नावाच्या विभागाचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३३,७०,००० (१९७२). हे उरल नदीवर मॉस्कोपासून १,२०० किमी.वर वसले आहे. १९०५ मध्ये ट्रान्स-कॅस्पियन लोहमार्ग सुरू झाल्यापासून ह्या शहराला ऊर्जितावस्था आली. रेल्वे एंजिने व डबे दुरुस्ती, विमाने व ट्रॅक्टर यांचे भाग, कापडखोगिरे, पादत्राणे, दारू गाळणे, लाकूड कापणे, विटा भाजणे वगैरे अनेक लहानमोठे कारखाने येथे आहेत. तसेच धान्य दळणे, कातडी, मांस, दुभत्याचे पदार्थ, जनावरांचे खाद्य, हॉप्स इत्यादींच्या प्रक्रियेचे हे केंद्र आहे. शेतकी, वैद्यक, शिक्षक विद्यालये, संग्रहालये, कॅथीड्रल, जुन्या इमारती येथे आहेत. मध्य आशियातील कित्येक खुष्कीच्या मार्गांचे ओरेनबुर्ग हे केंद्र आहे.                

लिमये, दि. ह.