ॲडिलेड : ऑस्ट्रेलियातील चौथ्या क्रमांकाचे शहर व प्रमुख बंदर, साउथ ऑस्ट्रेलिया राज्याची राजधानी. लोकसंख्या ८,४२,६९३ (१९७१). पुलिनमय मैदानावर वसलेले ॲडिलेड पूर्वेकडून मौंट लॉफ्टी पर्वतश्रेणींनी व पश्चिमेकडून सेंट व्हिन्सेंट आखाताच्या वालुकामय किनाऱ्याने वेष्टिलेले आहे. शहराच्या मध्यावरून पूर्व-पश्चिम टॉरेन्झ नदी वाहते. तिच्या दक्षिणेकडील भाग कार्यालये व व्यापारपेठा ह्यांनी गजबजलेला असून उत्तरेकडे रमणीय उद्यानांचा भाग आहे. शहरात अनेक उपनगरे असून पोर्ट ॲडिलेड ११ किमी. वायव्येस आहे. ॲडिलेडचे हवामान भूमध्य सागरीय असून सरासरी वार्षिक तपमान ११° से. ते २३° से. व सरासरी पर्जन्यमान ५५ सेंमी. असते. १८३६ मध्ये येथे प्रथम वसाहत झाली. १८३७ मध्ये कर्नल विल्यम लाइटने शहराचा चौरसाकृती आराखडा तयार केला. १८४० मध्ये देशातील पहिली नगरपालिका येथे अस्तित्वात आली.

एके काळी हे गव्हाचे कोठार समजले जाई. खनिज उत्पादनामुळे याचे महत्त्व वाढले. अन्नपदार्थ, कृषियंत्रे, मोटारींचे सांगाडे, लोखंडी नळ्या, रसायने, प्रशीतके व विजेची उपकरणे, मातीची भांडी, चामड्याच्या वस्तू, लोकरी कापड, तेलशुद्धीकरण इत्यादींचे कारखाने येथे असून गहू, पीठ, दुग्धपदार्थ, फळफळावळ, तांबे, चांदी व शिसे यांची निर्यात होते. दक्षिण ऑस्ट्रेलियातील बंदरांतून झालेल्या निर्यातीपैकी ७५ टक्के निर्यात येथून होते.

‘रेखीव शहर’ अशी याची ख्याती असून उद्याने व बागांसाठी शहरात ६८८ हेक्टर जागा राखून ठेवलेली आहे. टॉरेन्झवरील धरणामुळे झालेले तळे, विविध क्रीडांगणे यांकरिता शहराची प्रसिद्धी असून येथील क्रिकेटचे मैदान जगातील उत्कृष्ट मैदानांपैकी एक समजले जाते.

ॲडिलेड विद्यापीठ, संसदभवन, सर्वोच्च न्यायालय, अनेक चर्च, वाचनालय, वस्तुसंग्रहालय इ. अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांसाठी शहर प्रसिद्ध असून येथे १९६० मध्ये पहिला कलामहोत्सव भरला होता.

गद्रे, वि. रा.