ह्यूस्टन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील टेक्सस राज्याच्या हॅरिस कौंटीचे मुख्यालय व बंदर. हे राज्यातील सर्वांत मोठे आणि देशातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मेक्सिकोच्या आखात किनाऱ्यावरील गॅल्व्हस्टनपासून वायव्येस सु. ८० किमी.वर हे शहर वसले आहे. लोकसंख्या २२,३९,५५९ (२०१४).

ह्यूस्टन आसमंतात हॅरिसबर्ग या नावाची वसाहत होती (१८२६). ऑगस्ट १८३६ मध्ये न्यूयॉर्कच्या ऑगस्टस सी. व जॉन के. ॲलन बंधूंनी येथे जमीन खरेदी करून हे वसविले. जसिन्टो लढाईतील (टेक्सस--मेक्सिकन युद्ध) विजयाचा नायक व टेक्सस प्रजासत्ताकाचा पहिला राष्ट्राध्यक्ष सॅम ह्यूस्टन याच्या नावावरून याचे ‘ह्यूस्टन’ असे नामकरणझाले. यास १८३७ मध्ये शहराचा दर्जा मिळाला. १८३७–३९ या कालावधीत येथे टेक्सस प्रजासत्ताकाची राजधानी होती. अमेरिकन यादवीयुद्धावेळी १८६३ मध्ये सैनिकी दृष्ट्या यास महत्त्व प्राप्त झाले होते. येथे १८३९ व १८६७ मध्ये पीतज्वर साथीच्या रोगाचा प्रार्दुभाव झाला होता. तसेच १८५९ मध्ये आगीमुळे शहराची हानी झाली होती. १८९० च्या सुमारास कापूस व शेतमालाची प्रमुख बाजारपेठ येथे होती. येथील खनिजतेलाच्या शोधामुळे (१९०१) व ‘ह्यूस्टन शिप चॅनल’ सुरू झाल्याने (१९१४) हे व्यापार व वितरण केंद्र म्हणून विकास पावले. १९२९, १९३५ मधील वादळे, २००१ मधील अलीसन वादळ व पुराने शहराची हानी झाली होती.

ह्यूस्टन जगातील प्रमुख खनिजतेल क्षेत्रांपैकी एक असून खनिजतेल शुद्धीकरण, खनिजतेल रसायन उत्पादने व नैसर्गिक वायू वितरण व ऊर्जा केंद्र यांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. येथे खनिजतेलाच्या ११,००० पेक्षा जास्त विहिरी व नैसर्गिक वायूचे अनेक यंत्रसंच आहेत. येथील ३० खनिजतेल शुद्धीकरण कारखान्यांची क्षमता देशाच्या या क्षेत्रातील एकूण क्षमतेच्या ३०% पेक्षा जास्त आहे. याच्या आसमंतातील विपुल नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे ह्यूस्टन शिप चॅनलच्या किनारी उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण व विकास झालेला आहे. हा औद्योगिक पट्टा ‘द गोल्डन स्ट्रिपम्हणून ओळखला जातो.

येथे जहाजबांधणी, रसायन, अन्नप्रक्रिया, सिमेंट, कृत्रिम रबर, धातू, यंत्रसामग्री, कापड, गंधक, सैंधव (मीठ) इ. निर्मितिउद्योग विकसित झाले आहेत. दळणवळणात यास विशेष महत्त्व असून १८९१ पासून लोहमार्ग केंद्र म्हणून हे प्रसिद्ध आहे. हे रस्त्यांनी मोठमोठ्या शहरांशी जोडले आहे.येथे जॉर्ज बुश व विल्यम पी. हॉबी हे दोन विमानतळ आहेत. अ.सं.सं.- मधील हे प्रमुख अंतर्गत बंदर असून हे ‘ह्यूस्टन शिप चॅनल ‘द्वारे गॅल्व्हस्टन येथे मेक्सिको आखाताला आणि इन्ट्राकोस्टल वॉटरवेला जोडले आहे. ह्यूस्टन शिप चॅनलची लांबी ८१.३ किमी., किमान रुंदी ९० मी. व खोली ११ मी. आहे. ह्यूस्टन शिप चॅनल १९१४ पासून वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. येथून दरवर्षी सु. ४,००० पेक्षा जास्त जहाजांची ये-जा होते. अ.सं.सं.मधील खनिजतेल, रसायने, प्लॅस्टिक, लोह-पोलाद इ. वाहतुकीत हे बंदर अग्रगण्य आहे.

ह्यूस्टनमध्ये अनेक शिक्षणसंस्था असून यांमध्ये राइस युनिव्हर्सिटी (१८९१), युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टन (१९२७), टेक्सस सदर्न युनिव्हर्सिटी (१९४७), ह्यूस्टन बॅप्टिस्ट युनिव्हर्सिटी (१९६०) इ. समावेश होतो. येथील टेक्सस वैद्यकीय केंद्रात (१९४५) अनेक नामवंत रुग्णालये व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित संस्था आहेत. यामध्ये बॉयलर कॉलेजऑफ मेडिसीन (१९००), द युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सस हेल्थ सायन्ससेंटर (१९७२), द टेक्सस वुमन्स युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ नर्सिंग, एम. डी. अँडरसन कॅन्सर सेंटर इ. प्रसिद्ध आहेत.

ह्यूस्टन येथे अ.सं.सं.चे लिंडन बी. जॉन्सन अवकाशयान केंद्र आहे (१९६२). या केंद्रामुळेही या शहरास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. येथील डाउनटाउन थिएटर डिस्ट्रिक्ट भाग अनेक कलासंस्थांचे केंद्र समजला जातो. येथील जी. एस. वरथॅम थिएटर, जेसी एच. जोन्स हॉल, ॲले थिएटर, द ह्यूस्टन ग्रँड ऑपेरा, ह्यूस्टन सिंफनी आर्केस्ट्रा इत्यादींचे येथील सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. येथे दरवर्षी ‘ह्यूस्टन लाइव्हस्टॉक शो अँड रोडेओ’ उत्सव भरतो. येथे १,२०० पेक्षा जास्त चर्च आहेत. येथील द म्यूझीयम ऑफ फाइन आर्ट (१९००), ॲस्ट्रोडोम प्रेक्षागार (१९६५), इ चिल्ड्रन म्यूझीयम, द ह्यूस्टन म्यूझीयम ऑफ नॅचरल सायन्सेस, हेरमान पार्क, मेमोरियल पार्क, ऐतिहासिक स्थळ सॅन जसिन्टो युद्धभूमी आणि तेथील १७४ मी. उंचीचा सॅन जसिन्टो स्मारकस्तंभ, सुंदर पुळणी इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.