व्हिल्हेल्म्सहाफेन : जर्मनीच्या लोअर सॅक्सनी राज्यातील एक शहर व बंदर. लोकसंख्या ८९,८९२ (१९८९ अंदाज). जर्मनीच्या वायव्य भागात, उत्तर समुद्रातील याद (यादबूझन) उपसागराच्या पश्चिम किनाऱ्यावर एम्स – याद कालव्याच्या पूर्व मुखाशी हे शहर वसले आहे. सुरुवातीला हा प्रदेश ओल्डेनबर्ग राज्याचा एक भाग होता. नौसेना तळ उभारण्यासाठी प्रशियाने ओल्डेनबर्गकडून येथील काही जागा खरेदी केली आणि प्रशियन राजा पहिला व्हिल्हेल्म (विल्यम) याने या ठिकाणी नौसेना तळ व शहराची स्थापना केली (१८५३). त्याचेच नाव शहराला देण्यात आले (१९६९). ३० ऑक्टोबर १९१८ रोजी येथे खलाशांचे मोठे बंड झाले. १९३७ मध्ये लगतचे रस्ट्रिंगेन नगर व्हिल्हेल्म्सहाफेन शहरात समाविष्ट करण्यात येऊन ते पुन्हा ओल्डेनबर्ग राज्याला जोडण्यात आले. १९४५पर्यंत हे ओल्डेनबर्गमध्येच राहिले. प्रशियन नौसेनेचा (पुढे जर्मनीचा) प्रमुख नाविक तळ येथे होता. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी केलेल्या बाँबहल्यात शहराची तसेच नौसेना तळाची फार मोठी हानी झाली. १९४५ नंतर येथील नाविक तळाच्या उर्वरित सुविधाही काढून टाकण्यात आल्या. १९५६ मध्ये येथे पुन्हा नाविक तळ उभारण्यात आला. जर्मनीच्या एकीकरणापूर्वी हे शहर पश्चिम जर्मनीत होते.

व्हिल्हेल्म्सहाफेन हे एक प्रमुख औद्योगिक व व्यापारी केंद्र, तसेच महत्त्वाचे लोहमार्ग प्रस्थानक व बंदर आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर येथील उद्योगधंद्याची नव्याने पुन:स्थापना करण्यात आली. पूर्वी येथील उद्योग नौसेना-निर्मितीशी निगडित होते. धातुकाम, अवजड यंत्रनिर्मिती, लोह व पोलाद प्रक्रिया, स्वयंचलित गाड्यांचे साटे, वाऱ्यांचे उत्पादन, जहाजबांधणी, शीतपेट्या, विद्युत्-मोटारी, विद्युत्-उपकरणे, निर्वात यंत्रे, लाकडी सामान, चामड्याच्या वस्तू, टंकलेखन यंत्रे तयार करणे इ. उद्योगधंदे येथे चालतात. हे एक कृत्रिम बंदर असून तेलवाहतुकीसाठी त्याचा वापर केला जातो. या बंदरातून खोल सागरी मासेमारी करणारी जहाजे जातात. येथून ऱ्हाईन-रुर औद्योगिक विभागापर्यंत तेलवाहक नळ टाकलेले आहेत. मॅक्स प्लांक सागरी जीवविज्ञान संस्था, पक्षिविज्ञान केंद्र, शिक्षक प्रशिक्षण, तसेच भूविज्ञान, राज्यशास्त्र व अर्थविषयक संस्था येथे आहेत. एक प्रमुख पर्यटन केंद्र व आरोग्यधाम म्हणूनही हे बंदर महत्त्वाचे आहे.                                             

चौधरी, वसंत