भतिंडा : (भटिंडा). पंजाब राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे ठिकाण. लोकसंख्या १,२७,४५० (१९८१). हे इतिहासप्रसिद्ध शहर पतियाळ्याच्या नैऋत्येस सु. १३६ किमी. अंतरावर वसले असून शेत माल व औद्योगिक उत्पादने यांचे व्यापारकेंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. दिल्ली-फीरोझपूर या लोहमार्गावरील हे रेल्वे प्रस्थानक असून भारतातील काही राज्यांत तसेच पाकिस्तानात येथून लोहमार्ग जातात. सुलतान अल्तमशच्या ताब्यातील भतिंडा हा प्रांत पतियाळ्याचे महाराज अलसिंग यांनी १७५४ मध्ये जिंकल्याचा उल्लेख आढळतो. स्वातंत्र्योत्तर काळात शहराचा औद्योगिक विकास झालेला असून येथील हातमाग उद्योग प्रगत आहे. येथे व्यापारी दृष्ट्या चालविण्यात येणाऱ्या पीठगिरण्या आहेत. गुरु नानक औष्णिक विद्युतनिर्मिति संयंत्राचा चौथा जनित्र विभाग येथे जानेवारी १९७९ मध्ये कार्यान्वित झाला. शहराच्या परिसरात गहू, कापूस, ऊस, हरभरा इ. पिके घेतली जातात. शहरात एक महाविद्यालय तसेच सोळाव्या शतकात बांधलेला गोविंदगढ किल्ला असून त्याच्या भिंती ३६ मी. उंच आहेत. ‘गोविंदगढ’ या नावानेही भतिंडा ओळखले जाते. शहरातील मुस्लिम संत बाबा रतन यांची कबर उल्लेखनीय आहे.

संकपाळ, ज. वा.