रॉस्टॉक : पूर्व जर्मनीच्या याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय, महत्त्वाचे बंदर औद्योगिक केंद्र. लोकसंख्या २,४१,९०० (१९८४ अंदाज). हे व्हार्नो नदीवर वसले असून ते मेक्लनबुर्क आखाताच्या दक्षिणेस १३ किमी. आणि बर्लिनच्या वायव्हेस २०१ किमी. अंतरावर आहे.

बाराव्या शतकातील वेंडिश वसाहतीच्या या गावाला १२१८ मध्ये सनद मिळाली. चौदाव्या शतकातील ‘हॅन्सिअँटिक लीग’ या जर्मन व्यापारी संघाचा एक सदस्य म्हणून काही काळ त्याचा प्रभाव पडला होता. १३१४ मध्ये मेक्लनबुर्कच्या ताब्यात आणि नंतर १३५२ मध्ये मेक्लनबुर्क-श्व्हेरीन व १६९५ मध्ये म्यूस्को येथील दोघा सरदारांच्या संयुक्त नियंत्रणाखाली राहिले. दुसऱ्या महायुद्धापूर्वी रॉस्टॉक हे जहाज बांधणीचे लहानसे केंद्र होते. रॉस्टॉकच्या जहाज बांधणी कारखान्यांमधून लाकडी मध्ययुगापासून लाकडी जहाजे बांधण्यात येत असत हे काम १८५१ पर्यंत चालू होते. याच वर्षी पहिले बाष्पचालित जर्मन जहाज येथे बांधण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात रॉस्टॉकवर प्रचंड बाँबवृष्टी झाल्याने शहराची अतिशय हानी झाली. त्यानंतर नगराची पुनर्रचना मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. येथील व्हिल्हेल्म पीएक युनिव्हर्सिटी ऑफ रॉस्टॉक (१४९९) हे विद्यापीठ एकेकाळी ल्यूथरन संप्रदायाचा वालेकिल्ला समजण्यात येत होते.

दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात पूर्व जर्मनीच्या शासनाने शहरात जहाजबांधणीचे मोठे कारखाने उभारले. बार्नमून्ड हे याचे सागरी बंदर असून देशातील प्रमुख सागरी बंदर म्हणून शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला. रेल्वे प्रस्थानक व पूर्व जर्मनीच्या आयात तेल-पुरवठ्याचे प्रमुख प्रवेशकेंद्र म्हणून रॉस्टॉकला महत्त्व आहे. शहरात प्रचंड तेलटाक्या बांधण्यात आल्या असून मासेमारी केंद्र म्हणून रॉस्टॉक प्रसिद्ध आहे. शहरातील उद्योगांत शेती अवजारे व यंत्रे, वजन यंत्रे, धातुकाम, रसायने, मासेप्रक्रिया, डीझेल एंजिने, आगकाड्या, फर्निचर इत्यादींचा प्रामुख्याने समावेश होतो.

गॉथिककालीन उल्लेखनीय चर्चवास्तूंमध्ये ‘चर्च ऑफ सेंट मेरी’ चौदाव्या शतकातील ‘चर्च ऑफ सेंट निकालस’, पंधराव्या शतकातील ‘सेंट पीटर्स चर्च’ तसेच बरोक शैलीतील दर्शनी भाग असलेले नगरभगन इत्यादींचा समावेश होतो. शहरातील ‘पीपल्स थिएटर ऑफ रॉस्टॉक’ हे रंगमंदिर संबंध देशात विख्यात समजले जाते. प्रसिद्ध प्रशियन फील्डमार्शल ब्ल्यूखर (१७४२−१८१९) याचे रॉस्टॉक हे जन्मग्राम होय.

गद्रे, वि. रा.