सायान पर्वत : रशियातील सायबीरियाच्या दक्षिण भागातील पर्वत.सायान पर्वतश्रेण्या म्हणजे अल्ताई पर्वताचाच विस्तारित भाग असून पर्वताच्या पूर्व व पश्चिम सायान अशा दोन श्रेण्या आहेत. पूर्व सायानचा विस्तार वायव्येस येनेसी नदीखोऱ्यापासून आग्नेयीस बैकल सरोवराच्या नैर्ऋत्य किनाऱ्यापर्यंत झालेला आहे. या श्रेणीची लांबी १,०९० किमी. आहे. मुंकू-सार्डिक (उंची ३,५६२ मी.) हे या श्रेणीतील सर्वोच्च शिखर आहे. रशिया-मंगोलियादरम्यानची काही सरहद्द या श्रेणीने निर्माण केली आहे. या श्रेणीचा काही विस्तार मंगोलियातही झालेला आहे. पूर्व सायानमध्ये अनेक छोट्याछोट्या हिमनद्या आढळतात. पश्चिम सायान श्रेणीचा विस्तार अल्ताई पर्वतापासून ईशान्येस पूर्व सायान श्रेणीच्या मध्यभागापर्यंत झालेला आहे. या श्रेणीची लांबी ६४५ किमी. असून उंची ३,१११ मीटरपर्यंत आहे. ही श्रेणी पूर्णपणे रशियात आहे.

सायान पर्वताच्या दोन्ही श्रेण्यांचा भूशास्त्रीय इतिहास भिन्न भिन्न आहे. दोन्ही रांगा मध्यवर्ती असलेल्या सु. ३,००० मी. उंचीच्या नॉट (पठार) मध्ये एकत्र येतात. पूर्वेकडील श्रेण्या पश्चिमेकडील श्रेण्यांपेक्षा अधिक उंचीच्या आहेत. यांचा मंगोलियन पठाराकडील उतार मंद असून सायबीरियाकडील उतार तीव्र आहे. दोन्ही श्रेण्यांचे खणन येनेसी व तिच्या उपनद्यांनी केलेले आहे. पश्चिम सायानमध्ये येनेसी नदीने खोल घळई निर्माण केली आहे. मुझताघ (२,२८०मी.), मंगोल (१,९८१मी.), तेंगीझ (२,२८०मी.), ओबोसार्यम (१,८५९मी.) या सायानमधील प्रमुख खिंडी आहेत. सोने, ग्रॅफाइट, कोळसा, रूपे व शिसे ही खनिज उत्पादने येथून मिळतात. पर्वतीय प्रदेशात दाट अरण्ये असून त्यांत सीडार, पाइन, एल्डर, बर्च, ऱ्होडोडेंड्रॉन, फर इ. वृक्ष आढळतात. या पर्वतीय प्रदेशात लाकूडतोड, कृषी व शिकार हे प्रमुख व्यवसाय चालतात.

चौधरी, वसंत