व्हेल्ड पठार : (फेल्ड किंवा फील्ड पठार). दक्षिण आफ्रिकेतील कुराणांखालील व शेतीखालील पठारी प्रदेश. हा समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश ‘व्हेल्ड’ या नावाने ओळखला जातो. उंचीनुसार व्हेल्ड प्रदेशाचे पुढीलप्रमाणे तीन विभाग पडतात : (१) हाय व्हेल्ड (उंची १,२०० ते १,८०० मी.), (२) मिड्‌ल व्हेल्ड (उंची ६०० ते १,२०० मी.), (३) लो व्हेल्ड (उंची १५० ते ६०० मी.). वनस्पतिजीवनाला अनुसरून व्हेल्डचे झुडुपांचा, काटेरी वनस्पतींचा व गवताळ प्रदेश असेही विभाग केले जातात. मात्र या विभागांच्या सरहद्दी अनिश्चित स्वरूपाच्या आहेत.

हाय व्हेल्डचा विस्तार दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक, बोट्‌स्वाना, लेसोथो व झिंबाब्वेमधील उंच पठारी प्रदेशात आहे. येथील हवामान सौम्य व प्राणिजीवन समृद्ध आहे. अतिप्राचीन काळातील आद्य मनुष्यवस्तीचा हा प्रदेश असावा. दक्षिण आफ्रिका व झिंबाब्वेमधील व्हेल्ड प्रदेश शेती व पशुपालन, तसेच सोने व इतर खनिजांसाठी विशेष प्रसिद्ध अहे. बटाटे व मका हे येथील महत्त्वाचे उत्पादन. या दोन्ही देशांतील लोकसंख्या, तसेच व्यापार व कारखानदारी यांचे केंद्रीकरण हाय व्हेल्डमध्येच झालेले दिसते.

मिड्‌ल व्हेल्ड प्रदेश विस्तृत व भूशास्त्रीयदृष्ट्या मिश्र स्वरूपाचा असून त्याचा विस्तार दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप प्रांतात व नामिबियात आहे. याचा बहुतांश पृष्ठभाग खडकाळ आहे. लो व्हेल्ड प्रदेशाचे दोन विभाग असून त्यांपैकी एक विभाग पूर्व ट्रान्सव्हाल व स्वाझीलँडमध्ये, तर दुसरा आग्नेय झिंबाब्वेमध्ये आहे. पहिल्या दोन विभागांपेक्षा तिसऱ्या विभागातील मृदा अधिक सुपीक आहे.       

व्हेल्ड प्रदेशातील पर्जन्यमान मध्यम किंवा कमी, तर हिवाळे सौम्य किंवा उबदार आणि उन्हाळे उष्ण किंवा अतिउष्ण स्वरूपाचे असतात. सूर्यप्रकाश भरपूर असतो. दक्षिण आफ्रिकेतील हाय व्हेल्डमध्ये तांबूस गवत आढळते. मिड्‌ल व्हेल्डमध्ये तांबूस गवताबरोबरच दुष्काळाला तोंड देऊ शकणाऱ्या वनस्पती आढळतात. लो व्हेल्डमध्ये बाभूळ, खैर इ. वनस्पती व विविध प्रकारचे भरपूर गवत आढळते. 

मोठ्या प्रमाणावरील शिकारीमुळे व्हेल्डमधील मुख्य सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी व विविध जातींच्या पक्ष्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. अभयारण्ये वा सुरक्षित उद्याने यांतून मात्र प्राणिजीवन जतन केलेले आहे. उदा. ट्रान्सव्हालमधील क्रूगर नॅशनल पार्क. आफ्रिका खंडातील मनुष्यवस्तीस सर्वांत जास्त अनुकूल असा हा व्हेल्डचा प्रदेश आहे.

पहा : गवताळ प्रदेश.                           

        चौधरी, वसंत