कुनमिंग : चीनच्या युनान प्रांताची राजधानी. लोकसंख्या सु. १७ लक्ष (१९७० अंदाज). युनान पठारावर, कुनमिंग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर हे वसलेले आहे. येथून पूर्वेकडे सीजिआंग नदी खोऱ्याकडे, ईशान्येस ग्वेयांग शहराकडे आणि नैर्ॠत्येस ब्रह्मदेशाकडे मार्ग जातात. १९१० मध्ये फ्रेंचांनी बांधलेल्या रेल्वेमुळे याचे महत्त्व वाढले. दुसऱ्या महायुद्धात हे महत्त्वाचे लष्करी केंद्र होते. भोवतीचा प्रदेश सुपीक आहे. युद्धकाळात येथे बरेच उद्योगधंदे वाढले, तरी आता याचे महत्त्व वाहतूककेंद्र म्हणूनच आहे. येथे युनान विद्यापीठ, वैद्यकीय महाविद्यालय व तांत्रिकी शिक्षणसंस्था आहे.

कुमठेकर, ज. ब.