ब्रूस, जेम्स : (१४ डिसेंबर १७३० – २७ एप्रिल १७९४). आफ्रिका खंडाचे संशोधन करणारा स्कॉटिश समन्वेषक. ग्रेट ब्रिटनमधील स्कॉटलंडच्या स्टर्लिंगशर परगण्यातील किनेर्ड येथे जन्म. शालेय शिक्षण हॅरो येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण एडिंबरो येथे झाले. पुढे कायद्याच्या शिक्षणासाठी तो लंडनला गेला. १७५४ मध्ये त्याने एका मद्यव्यवसायातील व्यापाऱ्याची मुलगी ॲद्रिना ॲलन हिच्याशी विवाह केला. तिच्या अकाली निधनामुळे काही काळ त्याने विविध देशांचा प्रवास केला. परंतु स्पेन, पोर्तुगाल या देशांत पहावयास मिळालेल्या जुन्या अरबी ग्रंथांमुळे त्या भाषेविषयी त्याला विशेष कुतूहल निर्माण झाले. १७६२ मध्ये ब्रिटनने स्पेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धात त्याने भाग घेतला होता.

पुढे व्यापारदूत म्हणून अल्जीरियात त्याची नेमणूक झाली (१७६३-६५), त्यामुळे उत्तर आफ्रिकेविषयी माहिती मिळविणे त्याला शक्य झाले. नंतरच्या काळात त्याने सिरिया, ईजिप्त, क्रीट, उत्तर आफ्रिका इ. प्रदेशांना भेटी दिल्या. नाईल नदीच्या उगमाचा शोध घेण्याच्या उद्देशाने तो ॲलेक्झांड्रिया येथे आला व ८ जून १७६८ मध्ये त्याने कैरोहून प्रवासास प्रारंभ केला. आस्वान, तांबडा समुद्र, इथिओपियाचे बंदर मसावा या मार्गाने फेब्रुवारी १७७० मध्ये इथिओपियाची जुनी राजधानी गोंडार येथे तो आला. नोव्हेंबर १७७० मध्ये ताना सरोवराशी म्हणजेच त्या वेळी नाईल म्हणून समजल्या जाणाऱ्या नील नाईलच्या उगमस्थानाशी तो पोहोचला. नंतर तो सूदानमधील सेन्नरमार्गे आस्वान व नंतर ॲलेक्झांड्रियास व तेथून फ्रान्समधील मार्से या शहरी गेला. तेथे त्याने बफॉन आणि इतर विद्वानांच्या भेटी घेतल्या. १७७४ मध्ये तो लंडनला परतला. इथिओपियाच्या प्रवासावर आधारित असे त्याने ट्रॅव्हल टू डिस्कव्हर द सोअर्स ऑफ द नाईल, इन द पीअर्स १७६८-१७७३, हे पुस्तक १७९० मध्ये प्रकाशित केले. त्यात त्याने इथिओपियाविषयी इतकी अद्‌भुतरम्य वाटणारी माहिती दिलेली आहे की, डॉ. जॉन्सनसारख्यांनी त्या कपोलकल्पित कथा ठरविल्या. परंतु इथिओपियाला भेट देणाऱ्या जे. एल्. बुर्कहार्ट, जी. बी. बेल्‌त्सोनी इ. प्रवाशांनी ब्रूसच्या माहितीस दुजोरा दिला. ‘ॲबिसिनियन’ (इथिओपियाचे जुने नाव) या टोपणनावानेही तो पुष्कळदा ओळखला जातो. किनेर्ड येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : Reid, J. m. Traveller Extraordinary: The Life of James Bruce of Kinnaird, New York, 1968.

शाह, र. रू.