रेल्वे एंजिनांच्या कारखान्यांचा अंतर्भाग, चित्तरंजन

चित्तरंजन  :  पश्चिम बंगाल राज्यातील बरद्वान जिल्ह्यातील रेल्वे एंजिनांच्या कारखान्यासाठी प्रसिद्ध. हे कलकत्त्याच्या वायव्येस सु. २३० किमी. व दुर्गापूरच्या आग्नेयीस सु. ४० किमी.वर वसले आहे. लोकसंख्या ४२,९६५ (१९७१). चित्तरंजन हे एक नवीन वसलेले अत्यंत रेखीव औद्योगिक शहर असून १ नोव्हेंबर १९५० रोजी त्या वेळचे राष्ट्राध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी दे. भ. चित्तरंजनदास यांच्या स्मृत्यर्थ त्याचे चित्तरंजन असे नाव ठेवले. रेल्वे एंजिनांच्या कारखान्यामुळेच त्याला महत्त्व आले आहे. याच्या उत्तरेस संथाळ परगणा व अजय नदी आणि दक्षिणेस दामोदर व बराकर या नद्या आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत याच्या सभोवती घनदाट जंगल होते. परंतु हळूहळू ते कमी होऊन बराचसा भाग लागवडीखाली आला. या शहराचा पूर्व भाग उताराचा असून तेथे मोहाचे आणि शाल जातीचे वृक्ष आढळतात. आसमंतात लोखंड व कोळसा यांचा विपुल साठा असून त्याचा कारखान्यासाठी उपयोग होतो. चित्तरंजनला पाणीपुरवठा मुख्यत्वे अजय नदीपासून व उन्हाळ्यात येथे असलेल्या तळ्यांतून होतो. येथे उच्च विद्यालये, रुग्णालये, विश्रामगृहे, सामाजिक व सांस्कृतिक विकास केंद्रे आणि निरनिराळ्या उपयुक्त संस्था आहेत. 

संकपाळ, ज. बा.