अंजनेरी : नासिक जिल्ह्यात नासिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर नासिकपासून २२ किमी. अंतरावरील टेकडी व तिच्या पायथ्याशी वसलेला गाव. या टेकडीच्या पश्चिमेस मोठी खिंड व त्यापलीकडे त्र्यंबकेश्वराचा डोंगर आहे. अंजनेरीपासून त्र्यंबकेश्वर ६.४ किमी. दूर आहे. अंजनेरीची टेकडी सपाट माथ्याची आहे. तिला तीन शिखरे असल्यामुळे ‘त्रिकूट’ म्हणतात. तिचा परिसर ५ चौ. किमी. चा आहे. एका शिखराला किल्ला व त्यात अंजनीदेवीचे मंदिर आहे. त्यावरून ‘अंजनेरी’ हे नाव पडले असावे. येथे ⇨आभीरांचे मांडलिक त्रिकूटक चौथ्या शतकात राज्य करीत होते. यादवकालात अंजनेरी भरभराटलेली नगरी होती. त्या काळी तेथे जैनांची मोठी वस्ती होती. ११४१ मध्ये बांधलेले चंद्रप्रभ तीर्थंकराचे मंदिर, मठ व धर्मशाळा येथे आढळतात. एका जैन देवालयात ११४२ चा संस्कृत शिलालेख असून त्यात यादव राजपूत्र सेउणचंद्र याचा उल्लेख आहे. ब्राह्मणी वास्तुकलेचे नमुनेही येथे भरपूर असून गणपतीची मूर्ती व शिवलिंग आढळते.

राघोबादादा उन्हाळ्यात येथे राहत असत. त्या वेळी त्यांच्यासाठी बांधलेले ध्यानमंदीर, तलाव, बाह्मणतळे ही टाकी व फैलखाना येथे असून इंग्रजांनीही हे हवा खाण्याचे ठिकाण बनविले होते. १,३०९ मी. उंच असलेल्या या ठिकाणी नासिकहून आजही लोक हवा खाण्यास जातात.

जोशी, चंद्रहास