नँट्स : पश्चिम फ्रान्समधील लॉयर अटलांटिक प्रांताच्या राजधानीचे ठिकाण आणि बंदर. लोकसंख्या २,५५,६९३ (१९७५). हे टूर्सच्या पश्चिमेस सु. १७२ किमी., लॉयर–ॲर्द्र या नद्यांच्या संगमावर वसले आहे. नॅमनीटीझ या गॅलिक जमातीवरून या शहरास नँट्स असे नाव पडले असून या जमातीचे हे राजधानीचे ठिकाण होते. रोमन काळात हे व्यापाराचे मुख्य केंद्र होते. नॉर्मनांनी हे शहर लुटल्यानंतर ८३४ ते ९३६ पर्यंत त्यांच्याच ताब्यात होते. १४९९ मध्ये ब्रिटनीच्या ड्यूकने फ्रान्सचा राजा बारावा लुई यास हे शहर आंदण दिले. १५९८ मध्ये चौथ्या हेन्‍रीने जाहीर केलेली ‘एडिक्ट ऑफ नँट्स’ ही सनद नँट्सच्या इतिहासातील महत्त्वाची घटना होय. या सनदेमुळे फ्रेंच प्रॉटेस्टंटांना धर्मस्वातंत्र्य मिळाले. शतवार्षिक युद्ध, फ्रेंच राज्यक्रांती व दुसरे महायुद्ध यांवेळी या शहराचे खूपच नुकसान झाले. मात्र विसाव्या शतकातील अतिशय मोठ्या प्रमाणावर विकास पावलेल्या फ्रेंच शहरांमध्ये या शहराची गणना होते. १८९१ मध्ये आतापर्यंत जहाजे नेण्याकरिता नँट्स ते सँ नाझेरपर्यंत बांधलेल्या कालव्यामुळे या बंदराची उपयुक्तता जास्तच वाढली. वस्त्रोद्योग, यंत्रनिर्मिती, रसायन, जहाजबांधणी, मांस व मासे डबाबंद करणे, दोरखंड, बिस्किटे, साखर तसेच लोखंड व काच कारखाने इ. उद्योगधंदे येथे आहेत. महाविद्यालये, धार्मिक शाळा, वैद्यकीय माध्यमिक शाळा व जलविज्ञान शाळा इ. शैक्षणिक संस्था असून १४६० मध्ये स्थापन केलेले विद्यापीठ फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी नष्ट करण्यात आले. १९६१ मध्ये नवीन विद्यापीठाची स्थापना केली आहे. लाल रंगाचे गॉथिक शैलीचे कॅथीड्रल, ड्यूकचा किल्ला (नवव-दहावे शतक), एकोणीसशे साली स्थापलेले Palais des Beaux Arts हे चित्रसंग्रहालय या येथील प्रेक्षणीय वास्तू होत.

कांबळे, य. रा.