हायफाँग :व्हिएटनाममधील प्रमुख बंदर व देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर. हे देशाच्या उत्तर भागात, हानोईच्या पूर्वेस ६० किमी.वर, रेड नदीच्या त्रिभुज प्रदेशात ईशान्य भागात, स्वांगहुआंग त्रिभुज प्रदेशात, थाई बिन्ह नदीच्या एका फाट्यावर वसलेले आहे. ते टाँकिन आखातापासून १६ किमी.वर असून हानोईचे बाह्य बंदर आहे. लोकसंख्या १९,७०,००० (२०१० अंदाज). हे देशातील प्रमुख औद्योगिक व व्यापारी केंद्र असून हे लोहमार्गाने लाओ-काई, हानोई व चीनमधील कुनमिंग या शहरांशी व रस्त्यांनी इतर मोठ्या शहरांशी जोडलेले आहे.

 

इ. स. १८७० मध्ये फ्रेंच येथे आले. त्या वेळी हे लहानसे खेडे होते. फ्रेंच वसाहतकाळात याची भरभराट झाली व येथील बंदर सुविधेतही वाढ झाली. फ्रेंचांचा इंडोचायनामधील प्रमुख नाविक तळ येथे होता. हे दुसऱ्या महायुद्धात जपानच्या अखत्यारित होते. १९५४ नंतर हे व्हिएट-नामच्या आधिपत्याखाली आले. हे व्हिएटनाम युद्धात उत्तर व्हिएटनामचे सैनिकी साहित्य पुरविण्याचे प्रमुख बंदर होते. व्हिएटनाम युद्धात १९७० मध्ये अमेरिकेच्या बाँब वर्षावात येथील जहाजकारखाना, लोहमार्ग, औद्योगिक क्षेत्र व हजारो घरांची अतोनात हानी झाली होती. तसेचयेथील बंदराभोवती १९७२ मध्ये अमेरिकन सैन्याने सुरूंग पेरले होते. युद्धोत्तर कालावधीत याची पुनर्बांधणी करण्यात आली असून बंदराचे आधुनिकीकरण करण्यात आले. येथे नगरपालिका असून शहराचा कारभार केंद्र सरकारमार्फत नियंत्रित केला जातो.

 

शहरात अनेक वखारी, बंदर विभागात जहाज बांधणी व दुरुस्तीच्या आणि इतर गोद्या आहेत. नजीकच्या क्वांग निन्ह येथील अँथ्रॅसाइट कोळसा खाणीमुळे याचा औद्योगिक केंद्र म्हणून विकास झाला आहे. १९५४ नंतर सोव्हिएट रशिया, चीन यांच्या साहाय्याने येथे अनेक औद्योगिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. येथे सिमेंट, जहाज बांधणी व दुरुस्ती, कापड, मासेमारी, मासे डबाबंद करणे, अन्नप्रक्रिया, रासायनिक खते, कापड इ. उद्योग भरभराटीस आले आहेत.

 

गाडे, ना. स.