आगादिर : मोरोक्कोच्या आगादिर प्रांताची राजधानी आणि अटलांटिका महासागरावरील बंदर. लोकसंख्या सु. ३४,०००(१९७०). हे सूस नदीच्या मुखापासून उत्तरेला आठ किमी . आहे, १५०५–४५ पर्यंत हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. त्यांनी येथील टेकडीवर बांधलेला किल्ला आजही प्रेक्षणीय स्थळ म्हणून दाखविला जातो.१७६५ मध्ये मोरोक्कनांनी ह्या बंदरावर परदेशीय व्यापाऱ्यांना बंदी घातली. मोरोक्को फ्रान्‍सच्या संरक्षणाखाली आणण्याची बोलणी चालू असतानाच १९११ मध्ये जर्मन युद्धनौकेने येथे तळ दिल्यामुळे आगादिरमध्ये तंग वातावरण झाले . फ्रांन्सने जर्मनी बरोबर तह केल्यामुळे ते प्रकरण मिटले, परंतु आगादिरची वाढ त्यानंतर झपाट्याने झाली. सूस नदीखोऱ्यातील शेतीमालाची पेठ, आगादिरच्या पृष्ठप्रदेशात सापडणाऱ्या मॅंगॅनीज, कोबाल्ट, मॉलिब्डिनम, शिसे जस्त या खनिजपदार्थांचे निर्यातबंदर आणि समुद्र किनाऱ्यावर मिळणाऱ्या मासळीचे केंद्रस्थान म्हणून हे व्यापार, उद्योग व दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र बनले. १९६० मध्ये झालेल्या भूकंपाने आगादिर जवळजवळ नष्ट झाले होते.

लिमये, दि. इ.