ॲड्रेट-ऊबेक : डोंगराचे सूर्याभिमुखी आणि सूर्यपराङ्‌मुखी उतार. उष्ण कटिबंधाबाहेरच्या डोंगराळ प्रदेशांत डोंगराच्या उताराच्या दिशेला महत्त्व असते. विशेषत: पूर्वपश्चिम पसरलेल्या डोंगराच्या रांगांच्या दक्षिण आणि उत्तर उतारांत महत्त्वाचा फरक दिसून येतो. विषुववृत्ताच्या बाजूच्या उतारांवर सूर्यप्रकाश पडू शकतो ध्रुवाच्या बाजूच्या उतारांवर सूर्यप्रकाश फारसा पडत नाही तो बहुधा छायेतच असतो. याचे कारण उष्ण कटिबंधाबाहेरच्या प्रदेशांत सूर्य नेहमी विषुववृत्ताच्या बाजूसच असतो तो अगदी माथ्यावर किंवा ध्रुवाच्या बाजूला कधीच असू शकत नाही. विषुववृत्ताच्या बाजूच्या उताराला ‘सूर्याभिमुखी उतार-ॲड्रेट’ आणि ध्रुवाच्या बाजूच्या उताराला ‘सूर्यपराङ्‍‍मुखी उतार-ऊबेक’ म्हणतात. सूर्याभिमुखी उतारावर उष्णता अधिक मिळते, प्रकाश मिळतो, त्यांमुळे वनस्पती चांगल्या वाढतात. लोकही राहण्यासाठी, गवतावर गुरे व मेंढ्या चारण्यासाठी, फळबागांसाठी असे उतार अधिक पसंत करतात. याउलट परिस्थिती सूर्यपराङ्‌मुखी उतारावर असते. हिमालय, आल्प्स यांसारख्या पर्वतश्रेणींच्या बाबतींत ही गोष्ट विशेषत्वाने दिसून येते. काही यूरोपीय प्रदेशांत सूर्याभिमुखी उतारांवर त्यातल्यात्यात अधिक पैसेवाले लोक राहतात, तर सूर्यपराङ्‌मुखी उतारावर गरीब लोक आढळतात. दोन्ही उतारांबाबत दिसून येणाऱ्या या स्षप्ट फरकामुळे जर्मन, फ्रेंच, इटालियन इ. यूरोपीय भाषांत त्यांचे निदर्शक असे खास शब्द आढळतात. इंग्रजीत मूळच्या फ्रेंच शब्दांवरून आलेले ‘ॲड्रेट’ व ‘ऊबेक’ हे शब्द रूढ झालेले आहेत. हिमालयाच्या कुमाऊँ भागात यांसाठी शेतीयोग्य ‘तैलो’ व जंगल असलेला ‘सेलो’ हे शब्द रूढ आहेत.

कुमठेकर, ज. व.