येपर : बेल्जियममधील प. फ्लँडर्स प्रांतातील इतिहासप्रसिद्ध शहर. ते येपर्ली नदीकाठी ऑर्स्टेड शहराच्या दक्षिणेस ब्रूझ शहरापासून ४८ किमी. वर वसले आहे. लोकसंख्या २०,८२५ (१९७०). मध्ययुगात कापडनिर्मितीचे एक मोठे केंद्र म्हणून ते प्रसिद्ध होते. ब्रूझ, गेंट यांबरोबरच येपर हे हॅन्सिएटिक लीगचे (मध्ययुगीन जर्मन नगरांचा व्यापारी संघ) एक महत्त्वाचे केंद्र होते. तेराव्या शतकात तर फ्लँडर्सवर त्याचा पूर्ण अंमल होता. पंधराव्या शतकात मात्र अंतर्गत यादवी युद्धे आणि कापडउद्योगातील ब्रिटिशांशी स्पर्धा यांमुळे येपरची पीछेहाट झाली. सोळाव्या शतकातील धार्मिक कलहांमुळेही येथे मोठ्या प्रमाणात प्राणहानी घडून आली. सतराव्या शतकात फ्रेंचांनी या शहरास वेढा घातला होता तथापि १७१५ ते १७९४ पर्यंत येथे डचांचा लष्करी अंमल होता. त्यानंतर येथे फ्रेंचांनी पुन्हा आपला अंमल प्रस्थापित केला. पहिल्या महायुद्धात येपरमधील ब्रिटिशांची मोर्चेबांधणी उद्‌ध्वस्त करण्यात आली. येपरमधील भव्य वस्त्रभवन (मूळ उभारणी १२१४), सेंट मार्टिनचे कॅथीड्रल ( तेरावे शतक), लिली गेट व मेनिन गेट ही उल्लेखनीय आहेत. विद्यमान काळात येपर हे कृषिउत्पादनाची मोठी बाजारपेठ असून वस्त्रोद्योग आणि बांधकाम-साहित्य यांचे उद्योग येथे विकसित झाले आहेत.

क्षीरसागर, सुधा