कीरिन : चीनचा ईशान्य भागातील प्रांत. पूर्वीच्या मँचुरियातील तीन प्रांतांपैकी एक. क्षेत्रफळ १,८६,९२० चौ. किमी. लोकसंख्या सु. १·७ कोटी (१९६८). याच्या ईशान्येस रशिया, आग्नेयीस उत्तर कोरिया, पश्चिमेस इनर मंगोलियाचा स्वायत्त प्रांत व दक्षिणेस लिआउनिंग प्रांत आहे. चांगचुन ह्या राजधानीव्यतिरिक्त कीरिन, सुपिंग, लिआउयुआन ही प्रांतातील मोठी शहरे आहेत. प्रांताचा सखल पश्चिम भाग शेतीला उपयुक्त असून पूर्व भाग डोंगराळ आहे. याच भागात चांगपाई पर्वत आहे. सुंगारी नदी प्रांताच्या मध्यावरून वाहते. या नदीच्या कालव्यांवर व नैसर्गिक पाऊसपाण्यावर कीरिनमध्ये गहू, मका, सोयाबीन, तांदूळ, केओलिआंग ही पिके विपूल होतात. कीरिनच्या जंगलांत इमारती लाकूड व अन्य वनसंपत्ती भरपूर आहे. लोखंड, सोने, कोळसा व शिसे इ. खनिजेही पुष्कळ सापडतात. प्रांतभर लोहमार्गाचे जाळे विखुरलेले असून मूकडेन– चांगचुन – हार्बिन मार्ग प्रमुख आहे. औद्योगिक दृष्ट्याही कीरिन पुढारलेला असून चांगचुनचा मोटार कारखाना व कीरिन शहरातील लोह, पोलाद व रसायनाचे कारखाने प्रसिद्ध आहेत. खाद्यपदार्थांचे कारखाने व लाकूड कापण्याच्या गिरण्या प्रांतात सर्वत्र आहेत. चीनच्या समृद्ध प्रांतात किरिनची गणना आहे. कीरिन प्रांतात मुख्यत: चिनी वस्ती आहे. मात्र कोरियाच्या सरहद्दीला लागून येनपिअन कोरियन स्वायत्त विभाग असून त्यात कोरियन वस्ती पुष्कळ आहे. 

ओक, द. ह.