ब्राझा, प्येअर पॉल फ्रांस्वा कामीय साव्हॉर्न्यांद : (२६ जाने. १८५२-१४ सप्टेंबर १९०५). इटालियन फ्रेंच संशोधक. रोमजवळील कास्टेल गांडॉल्फॉ येथे जन्म. शिक्षण फ्रान्समध्ये. १८७४ मध्ये त्याने फ्रान्सचे नागरिकत्व मिळविले आणि तो फ्रेंच नाविक दलात दाखल झाला. नाविक दलातर्फे तो गाबाँ देशास गेला. तेथील स्थानिक लोकांच्या भाषेचा अभ्यास केल्यामुळे आफ्रिकेतील इतर अज्ञात प्रदेशांविषयी त्याची जिज्ञासा जागृत झाली. फ्रेंच सरकारकडून संशोधनाची संमती मिळाल्यावर ऑगस्ट १८७५ मध्ये तो पश्चिम आफ्रिकेच्या संशोधन मोहिमेवर निघाला. ओगोवे नदीपरिसराचे त्याने सखोल संशोधन केले तेथील आलीमा व लिकोना या उपनद्यांचा शोध लावून १८७८ मध्ये तो फ्रान्सला परतला. अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या काँगो नदीच्या मार्गाचे हेन्री स्टॅन्लीने केलेले समन्वेषण पाहून त्यापेक्षा वेगळा व चांगला मार्ग मध्य आफ्रिकेतून शोधून काढण्याचे त्याने ठरविले. १८७९ मध्ये तो परत आफ्रिकेला गेला व ओगोवे नदीमार्गाने फ्रान्सव्हिलचा शोध लावून तो काँगोच्या स्टॅन्लीपूलच्या प्रदेशात पोचला. तेथील बाटेकेचा अधिपती माकोको याच्याशी करार करून त्याने हा प्रदेश फ्रेंचांच्या आधिपत्याखाली आणला. काँगोच्या उत्तर किनाऱ्यावरील त्याने संशोधन केलेला हा प्रदेश पुढे ‘ब्रॅझाव्हिल’ म्हणून ओळखला जाऊ लागला. स्थानिक जमातप्रमुखांशी त्याने केलेले करार फ्रान्स सरकारने मान्य केले. १८८३ मध्ये याच प्रदेशात तो परत आला होता. १८८६ ते १८९८ या काळात या प्रदेशाचा कमिशनर जनरल म्हणून त्याने काम केले. सेनेगलमधील डाकार येथे त्याचे निधन झाले.

शाह, र. रू. पंडित, भाग्यश्री