ब्रुने, झां : ( ? – १८६९ ? – १९३०). आधुनिक काळातील फ्रेंच भूगोलवेत्ता. पॅरिसमध्ये शिक्षण. ⇨ पॉल व्हीदाल द ला ब्लाश यांच्या हाताखाली शिकून १८९२ मध्ये त्याने पदवी घेतली. पुढे स्वित्झर्लंडमधील फ्रायबुर्क विद्यापीठात त्याची भूगोलाचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली (१८९८). लोझॅन विद्यापीठात १९०८ च्या सुमारास मानवी भूगोल शिकविण्याकरिता त्यास पाचारण करण्यात आले. ब्लाशने ब्रुनेच्या मानवी भूगोलावरच्या संशोधनाची ‘ॲकॅडेमी ऑफ मॉरल ॲड पोलिटिकल सायन्सेस’ला शिफारस केली (१९११). ‘कॉलेज द फ्रान्स’ मध्ये १९१२ साली त्याने मानवी संशोधनाकरिता स्थापन करण्यात आलेल्या सन्माननीय पदाचा स्वीकार केला. पुढील एका तपात आपल्या संशोधनाच्या आधारे त्याने अनेक ग्रंथ लिहिले. फ्रान्सच्या विज्ञान अकादमीवर १९२७ मध्ये त्याची निवड झाली.

ब्रुनेने विपुल लेखन केले आहे. स्पेनमध्ये काही काळ असताना (१८९४) त्याने जलसिंचनावर प्रबंध लिहिला, तो १९०२ मध्ये प्रकाशित झाला. ज्या ग्रंथामुळे Geographie Humaine : essai de classification positiveतो मानवी भूगोलशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धीस आला, तो १९१० साली प्रकाशित झाला. १९१२ नंतरच्या कालावधीत त्याने पी. गिरार्डीन व पी. दिफाँन्तेनां या दोघांच्या सहकार्याने Geographic Humaine de la France आणि सी. व्हालो याच्याबरोबर La Geographice de Historic : Geographic de la paix et de la Guese sur terre et sur mer हे ग्रंथ लिहिले. अमेरिकन भूगोलशास्त्रज्ञ आयझेया बोमॅन (१८७८-१९५०) यांचे राजकीय भूगोलावरचे पुस्तकही त्याने फ्रेंच भाषेत भाषांतरित व अद्ययावत करून Le Monde Nouveau या नावाने प्रकाशित केले. ब्रुनेचे लिखाण भूगोलशास्त्रापुरते मर्यादित नव्हते. ईजिप्तमध्ये सापडलेल्या ॲरिस्टॉटलच्या पपायरसावरील हस्तलिखिताचे त्याने फ्रेंचमध्ये भाषांतर केले. झ्यूल मीश्ले (१७९८-१८७४) ह्या प्रसिद्ध फ्रेंच इतिहासकारावर ब्रुनेने लिहिलेल्या पुस्तकाला फ्रेंच अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. आपल्या पत्नीबरोबर त्याने रस्किन ॲड द बायबल हे पुस्तक लिहिले (१९०१).

ब्रुनेच्या काळात मानवी भूगोलाचा अभ्यास ब्लाशच्या शिकवणीप्रमाणे होई. ब्रुनेने त्या अभ्यासाचा पाया अधिक व्यापक केला. मानवी भूगोलाचा अभ्यास करताना लोकसंख्येचे वितरण तसेच राजकीय, आर्थिक व सामाजिक भूगोल या सर्व घटकांचा विचार करणे आवश्यक आहे, असा त्याचा दृष्टिकोन होता. ब्रुनेची भूगोलशास्त्रातील दुसरी महत्त्वाची कामगिरी म्हणजे, त्याने अमेरिकन व फ्रेंच भूगोल शास्त्रज्ञांमध्ये विचारांची देवाणघेवाण सुरू करण्यात पुढाकार घेतला.

संदर्भ : Dickinson, Robert E. The Makers of Modern Geography1969.

पंडित, अविनाश