वैशाली : प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध नगर व गणराज्य. ते सध्याच्या बिहार राज्यात, हाजीपूरच्या उत्तरेस सु. २९किमी. वर गंडक नदीच्या डाव्या तीरावर वैशाली जिल्ह्यात आहे. बसाढ म्हणजेच प्राचीन वैशाली असे मानतात. रामायण, मनुसंहिता, पुराणे आणि चिनी प्रवाशांचे वृतांत यांतून वैशालीचा उल्लेख आढळतो. मात्र सलग, साधार इतिहास बुद्धकाळापासून उपलब्ध होतो. रामायणातील (बालखंड ४७/२२–२४) उल्लेखानुसार इक्ष्वाकु कुळातील एका राजाला अलंबुषा नावाच्या अप्सरेपासून झालेला मुलगा विशाल. त्याने ही नगरी वसविली म्हणून तिचे नाव वैशाली पडले. विद्यमान बसाढनजीक प्राचीन वास्तूंचे काही अवशेष आढळतात. राम मिथिलेला सीतास्वयंवरासाठी जाताना वाटेत वैशाली नगरी लागली होती. असा उल्लेख मिळतो. बुद्धपूर्व काळात वैशालीवर लिच्छवी राजवंशाची सत्ता होती. वैशाली ही लिच्छवी गणराज्याची राजधानी, तसेच वृज्जी (वज्जी) संघाचे मुख्य स्थान होती. या संघाचे तत्कालीन मगध राज्याशी (इ. स. पू. सहावे शतक) शत्रुत्त्व होते. वैशालीच्या सैन्याने मगधावर आक्रमण केले, पण मगधाधिपती बिंबिसार याने त्याचा पराभव केला आणि तेथील राजाच्या चेल्लना नामक लिच्छवी राजकन्येशी विविध केला. तिची बहीण त्रिशला ही वर्धमान माहावीराची माता होय. बौद्ध जातकांतून लिच्छवीचा उल्लेख गणाधिपती म्हणून केलेला असून ईशान्य भारतातील एक वैभवशाली गणराज्य म्हणून वैशालीचा उल्लेख आहे. ⇨अकथांतून वैशालीच्या गणराज्याची घटना (संविधान) दिलेली असून राजा, उपराजा आणि सेनापती या तीन अधिकाऱ्यांच्या तीत उल्लेख आहे. या प्राचीन नगरात एक भव्य सभागृह होते. त्यात नागरिकांच्या सभा होत. जातकातील उल्लेखांवरून वैशाली गणराज्याचे सु. ७,७०७ मूळ सदस्य होते आणि वैशालीची लोकसंख्या सु. १,६८,००० (महावस्तू व त्रिशंकुनीय जातक) होती. गौतम बुद्ध व भगवान महावीर यांना वैशालीविषयी आत्यंतिक जिव्हाळा होता. बुद्धाने ते आदर्श राज्य मानले होते. त्याने काही धर्मप्रवचने वैशालीत केली होती. वैशालीची नगरवधू आम्रपाली बुद्धदर्शनाने प्रभावित होऊन भिक्षुणी बनली, असा उल्लेख मिळतो. महावीराचा जन्म वैशालीच्या कुंडग्राम या उपनगरात झाला. भवानी सूत्रावरील अभयदेवसूरी लिखित टीकेत महावीराला वैशालिक व त्रिशलेला विशाला म्हटले आहे. वर्धमान महावीराचे बालपण तसेच दिनदीक्षेनंतरची बारा वर्षे येथेच व्यतीत झाली. या महत्त्वाच्या घटनांमुळे जैनधर्मीय वैशालीला तीर्थक्षेत्र मानीत.

मौर्यकाळात गणराज्ये मानशेष झाली. तेंव्हा लिच्छवी राजवंश वैशालीत पुन्हा कार्यरत झाला. गुप्तकाळाच्या अखेरीपर्यंत वैशाली लिच्छवींच्या आधिपत्याखाली होते. पहिल्या चंद्रगुप्ताने लिच्छवी राजकन्या कुमारदेवी हिच्याशी विवाह करून लिच्छवी राजवंशाशी संबंध दृढतर केले. पुढे लिच्छवी राजवंशाने नेपाळमध्ये सत्ता हस्तगत केली आणि वैशाली नगर उजाड झाले.    

चिनी प्रवासी फाहियान आणि ह्यूएनत्संग यांच्या प्रवासवृत्तांतांत वैशालीविषयी माहिती मिळते. ह्यूएनत्संगाच्या मते गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर सु. ११० वर्षांनी येथे दुसरी बौद्ध धर्मपरिषद (संगीती) भरली होती. लिच्छवी गणांनीही येथे एक स्तूप बांधल्याचे ह्यूएनत्संग सांगतो. याशिवाय आनंद व सारिपुत्र मोग्गलायन यांच्या स्मरणार्थही स्तूप बांधले होते व एक स्तंभ उभारला होता. त्यावर सिंहमूर्ती होती. तो लेखरहित अशोकस्तंभ असावा, असे तज्ञांचे मत आहे.

बसाढ (वैशाली) येथील दोन प्रमुख टेकडांत काही उत्खनने झाली असून त्यांत प्रामुख्याने काळी-तांबडी मृतपात्रे आढळली. ह्यांवरून बुद्धपूर्व काळात येथे वस्ती असावी. वरच्या थरात सापडलेली चकचकीत काळी मृत्पात्रे बुद्धकालीन आहेत. बाल्श या संशोधकास या अवशेषांत एक गणेशमूर्ती मिळाली. मात्र अद्यापि या ठिकाणी विस्तृत उत्खनन झालेले नाही.

संदर्भ : 1. Jayaswal, K.P. Hindu Polity, Bangalore, 1968.

            2. Mishra, Yogendra, An Early History of Vaisali, Varanasi, 1962.

देशपांडे, सु. र.