मॅग्डालीना नदी : कोलंबिया देशातील (द. अमेरिका) एक प्रमुख उत्तरवाहिनी नदी. लांबी सु. १,५५४ किमी. अंतर्गत जलवाहतुकीच्या दृष्टीने ती महत्त्वाची आहे. कोलंबियाच्या पश्चिम भागातून दक्षिणोत्तर वाहणारी ही नदी २° उ. अक्षांश व ७६° ३० प. रेखांशांदरम्यान पोपिआनच्या दक्षिणेस सु. ५५ किमी. वर अँडीज पर्वतात (सेंट्रल कॉर्डिलेरा), सस. पासून सु. ४,००० मी. उंचीवर उगम पावते व उत्तरेस बारांगकिया शहराजवळ कॅरिबियन समुद्राला जाऊन मिळते.

मॅग्डालीना नदीचा उगमाकडील प्रवाह सेंट्रल कॉर्डिलेरा व कॉर्डिलेरा ओरेंटाल या रांगादरम्यानच्या सु. ८० किमी. रूंदीच्या प्रदेशातून वाहतो. खालच्या टप्प्यात ही नदी रुंद व सखल, तर काही ठिकाणी दलदलीच्या प्रदेशातून वाहते. मुखाकडील भागात, विशेषतः बारांगकिया शहराच्या वायव्येस, नदीच्या अनेक फाट्यांमुळे त्रिभुज प्रदेश निर्माण झाले आहेत. या नदीमुळे अंतर्गत भागातील डोंगराळ प्रदेश व सागर किनाऱ्यालगतचा सखल प्रदेश यांना जोडणारा नैसर्गिक दुवा निर्माण झाला आहे. मॅग्डालीना नदी मुखापासून अंतर्गत भागात सु. १,४५० किमी. पर्यंत जलवाहतुकीस उपयुक्त आहे, परंतु काहीकाही ठिकाणी द्रुतवाह, वाळूचे दांडे यांमुळे सलग वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. मुखाजवळील बारांगकिया शहरापासून ओंडा शहराजवळील ओंडा धबधब्यापर्यंत बरीचशी सलग जलवाहतूक होते. धबधब्याचा काही प्रदेश वगळता वरच्या भागात तेव्हा शहरापर्यंत नदीचा वाहतुकीस चांगला उपयोग होऊ शकतो. डिसेंबर ते एप्रिल या कोरड्या ऋतूत मात्र पात्रातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने वाहतुकीत खूपच अडचणी निर्माण होतात. नदीमुखाजवळ साचलेला गाळ उपसून मोठ्या सागरगामी बोडींना बारांगकिया बंदरात येण्याचा मार्ग सुकर करावा लागतो.

कौका ही मॅग्डालीन नदीची प्रमुख उपनदी असून ती पारामो देल ब्वे (कॉर्डिलेरा सेंट्रलचा एक भाग) या डोंगररांगेच्या उत्तर उतारावर उगम पावते व उत्तरेकडील सखल प्रदेशात मागांग्गे शहराच्या आग्नेएयीस सु. ५० किमी. वर मॅग्डालीना नदीस डावीकडून मिळते. या प्रमुख नदीशिवाय सेसार, सान हॉर्हे, बोगोटा, सोगामोसो या मॅग्डालीना नदीच्या इतर उपनद्या आहेत.

मॅग्डालीना नदीचा शोध १५०१ मध्ये रॉद्रीगो बास्तीदास या स्पॅनिश संशोधकाने लावला व पुढे १५३६ मध्ये हिमेनेस दे केसादा (१५००–७९) याने तिचे समन्वेषण केले. १८५० नंतर तंबाखूच्या व्यापारातील तेजीमुळे या नदीतून होणाऱ्या वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली, परंतु रस्ते, लोहमार्ग व हवाईमार्ग यांच्या विसाव्या शतकातील प्रगतीमुळे या जलवाहतुकीचे महत्त्व थोडे कमी होऊ लागले आहे. नदीखोऱ्यातील हवामान खंडीय प्रकारचे दमट असून बऱ्याच ठिकाणी लोकवस्ती विरळ आहे. या भागात खनिज तेल उद्योगाशिवाय अन्य व्यवसायांची फारशी प्रगती झालेली आढळत नाही. नदीच्या मुखाकडील प्रदेश मात्र पुराच्या गाळाने बनलेला व सुपीक आहे. नदीच्या मधल्या टप्प्यातील प्रदेशात प्रामुख्याने ऊस, काकाओ, कापूस, तंबाखू ही पिके घेतली जातात, तर डोंगरउतारावर कॉफीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. नदीच्या तीरावरील बारांग्काव्हेरमेहा हा देशातील प्रमुख खनिज तेल उत्पादक जिल्हा मानला जातो. यांशिवाय या खोऱ्यात तांबे, सोने, पारा इ. खनिजेही सापडतात. या नदीकाठावरील बारांग्काव्हेरमेहा हे शहर खनिज तेल व्यापाराचे प्रमुख ठिकाण असून तेथून कार्ताजीनापर्यंत तेलनळ टाकण्यात आले आहेत. हीरार्डोटा हे या नदीवरील दुसरे महत्त्वाचे शहर देशाच्या बोगोटा राजधानीच्या नैर्ऋत्येस असून ते राजधानीशी व पश्चिमेस पॅसिफिक महासागरावरील ब्वेनाव्हेंतुरा बंदराशी लोहमार्ग व महामार्ग यांनी जोडलेले आहे. यांशिवाय या नदीकिनाऱ्यावरील नेव्हा, नातागाइमा, पूरीफीकास्योन, ओंडा, प्वेर्तो बेरीओ, बारांग्काव्हेरमेहा, प्वेर्तो वील्चेस, एल् बांग्‌को, मोंपोस, मागांग्गे, कालामार, बारांगकिया इ. शहरे व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची आहेत. कालामार शहर पश्चिमेस सागरकिनाऱ्यावरील कार्ताजीना शहराशी कालव्याने जोडलेले असून जलवाहतुकीच्या दृष्टीने हा कालवा (कानाल देल डीका) महत्त्वाचा आहे.

चौंडे, मा. ल.