भीमा नदी : कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी. लांबी सु. ८६७ किमी., जलवाहनक्षेत्र सु. ७०,६१३ चौ. किमी. ‘भीमरथा’, ‘भीमरथी’ ही तिची इतर नावे असून सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे तिचे पात्र चंद्रकोरीप्रमाणे दिसते. त्यामुळे तेथे ती चंद्रभागा म्हणून ओळखली जाते. स्थूलमानाने आग्नेयवाहिनी असलेली ही नदी पुणे, अहमदनगर, सोलापूर या महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्यांतून व विजापूर, गुलबर्गा या कर्नाटक राज्याच्या जिल्ह्यांतून वाहत जाऊन कृष्णा नदीस मिळते.
भीमा नदी सह्याद्रीच्या रांगेत सस.पासून ९७५ मी. उंचीवर भीमाशंकरजवळ (जिल्हा पुणे) उगम पावते. उगमानंतर पुणे जिल्ह्यातून, पुणे-अहमदनगर व पुणे-सोलापूर जिल्ह्यांच्या सरहद्दींवरून व पुढे सोलापूर जिल्ह्यातून वाहत कर्नाटक राज्याच्या विजापूर जिल्ह्याच्या सरहद्दीपर्यंत येते. नंतर विजापूर व गुलबर्गा जिल्ह्यांच्या सरहद्दींवरून गुलबर्गा जिल्ह्यातून ती वाहत आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांच्या सीमेवर रायचूरच्या उत्तरेस २५ किमी.वर कुरूगड्डी येथे कृष्णा नदीस मिळते. उगमानंतर प्रारंभीचे सु. ६० किमी. अंतर नदीचा प्रवाह अरुंद व खोल अशा दरीतून वाहतो. परंतु पुढे मात्र तिचे पात्र रुंद होत गेलेले आहे. भामा, इंद्रायणी, वेळ, मुळा-मुठा, घोड, नीरा, माण, सीना इ. तिच्या प्रमुख उपनद्या होत.
जलसिंचनाच्या दृष्टीने या नदीस महत्त्व आहे. भीमा प्रकल्पान्वये या नदीस सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात उजनी येथे २,४६७ मी. लांब व ५६.४ मी. उंचीचे धरण बांधले जात आहे. यापासून १.६४ लाख हे. जमिनीस पाणीपुरवठा उपलब्ध होईल. जलसिंचनाच्या सोयीमुळे भीमा नदीखोऱ्यात शेतीचा विकास घडून येत आहे.
धार्मिक दृष्ट्याही भीमा नदीस महत्त्व असून तिला महानदी (मोठी नदी) असेही संबोधले जाते. मत्स्य, ब्रह्म, वामन इ. पुराणांतून व महाभारतातून या नदीचे निर्देश येतात. त्रिपुरासुराचा वध करून शंकर श्रमपरिहारार्थ भीमाशंकरजवळ आले असता तेथे अयोध्येचा भीमक नावाचा राजा तप करीत होता. तो शंकरास सामोरा गेला. त्यावेळी शंकराने प्रसन्न होऊन भीमकास वर मागण्यास सांगितले. त्यावेळी त्याने ‘शंकराला आलेल्या घामाच्या धारांची पुण्यपावन नदी होऊ दे’, असा वर मागितला व त्याप्रमाणे भीमेचा उगम झाला व भीमक राजाच्या नावावरून या नदीस भीमा हे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. या नदीच्या उगमस्थानी भीमाशंकर, पुढे नदीकाठी पंढरपूर, ब्रह्मपुरी, गाणगापूर इ. तीर्थक्षेत्रे आहेत.
गाडे, ना. स.