दारणा : गोदावरीची नासिक जिल्ह्यातील उपनदी. लांबी सु. ७७ किमी. ही इगतपुरीच्या आग्नेयीस १३ किमी. सह्याद्रीतील कुलांग किल्ले टेकडीच्या उत्तर उतारावर उगम पावून सामान्यतः ईशान्येकडे वाहत जाऊन नासिकच्या खाली सु. २४ किमी. वर गोदावरीस मिळते. नासिक–पुणे रस्त्याने सिन्नरला जाताना चेहेडी येथे तिच्यावर पूल आहे. नांदगावजवळ तिच्यावर १९१५-१६ मध्ये धरण बांधल्यामुळे लेक बीले हा २·२ लक्ष घ.मी. धारणेचा जलाशय निर्माण झाला आहे. यामुळे नांदूर–मदमेश्वर येथे गोदावरीवर सांडवा बांधून तिचे पाणी कालव्यात सोडणे शक्य झाले आहे. दारणेला उजवीकडून काडवा व डावीकडून बाकी, उंदुहोल आणि वालदेवी हे प्रमुख प्रवाह मिळतात. वैतरणा नदीच्या शिरःक्षरणामुळे दारणेच्या काही शीर्षप्रवाहांचे अपहरण झाले असावे असे दिसून येत आहे.

कुमठेकर, ज. ब.