आबादान : नैर्ऋत्य इराणच्या खुझिस्तान प्रांतातील प्रसिद्ध तेलकेंद्र लोकसंख्या २,८०,००० (१९७१). कारून नदी आणि टायग्रिस-युफ्रेटीस नद्यांचे शट-अल्-अरब नावाचे मुख, ह्यांच्यापासून ५३ किमी. वर असलेल्या बेटावर हे वसलेले असून ते तेलशुद्धीकरणाचे व जहाजवाहतुकीचे मोठे केंद्र आहे.

तेराव्या शतकात नासिर खुस्रौ ह्या इतिहासकाराने आबादान हा इराकचा अगदी दक्षिणेकडील भाग म्हणून उल्लेख केल्याचे आढळते. इराण व तुर्कस्तान ह्यांच्यात आबादान बेटाविषयी प्रदीर्घ काल कलह होता. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी आबादान बेटाचा लष्करी तळ म्हणून वापर केला होता. १९०९ मध्ये अँग्लो-पर्शियन तेलकंपनीने आबादान येथे तेलशुद्धीकरण केंद्र उभारले. काही काळपर्यंत ते जगातील सर्वांत मोठे तेलकेंद्र (प्रतिदिनी ५ लक्ष बॅरल) गणले जात होते झॅग्रॉस पर्वतश्रेणीच्या पायथ्याशी असलेल्या तेल-साठ्यांपासून २,८९० किमी. लांबीची नळ बसविलेले असून, ८०० किमी. लांबीचा तेहरानला जोडणारा तेलनळ १९५९ मध्ये बांधण्यात आला. आबादान बंदरात तेलवाहू जहाजांसाठी खोल धक्के बांधलेले आहेत. खुर्रामशहर बंदराशी व तेलशुद्धीकरण केंद्राशी आबादान डांबरी रस्त्यांनी जोडलेले आहे.

आबादानमधील हवामान अतिशय उष्ण व वर्षातील सात महिने अत्यंत दमट असते. तथापि औद्योगिक विकासामुळे इराणमधील अत्यंत सुंदर शहरांमध्ये आबादानची गणना होते. शहरात फरसबंदीचे रस्ते, रुग्णालये व शाळा आहेत. तेलकंपनीने आपल्या कामगारांकरिता व अधिकाऱ्यांकरिता उत्तम घरे बांधलेली आहेत. शहरात भरणारा साप्ताहिक बाजार प्रेक्षणीय असतो.

गद्रे, वि. रा.