गोल्डन : अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यातील जेफर्सन कौंटीचे मुख्य शहर. लोकसंख्या ९,८१७ (१९७०). हे डेन्व्हरच्या पश्चिमेला १६ किमी. असून समुद्रसपाटीपासून १,७३२ मी. उंचीवर आहे. हे हवा खाण्याचे उत्तम ठिकाण असून गुरांच्या व कोंबड्यांच्या बाजाराकरिता प्रसिद्ध आहे. जवळपास गहू, बीट, भाजीपाला, दुधदुभते यांचे उत्पन्न येते. येथे मद्ये, चिनीमातीची भांडी, भट्टी विटा यांचे कारखाने आहेत. आसपास कोळसा व सोने यांच्या खाणी आहेत. गोल्डन येथे खनिकर्म विद्यालय, सरकारी तांत्रिक शाळा इ. संस्था असून रॉकी पर्वत राष्ट्रीय उद्यानही आहे.

लिमये, दि. ह.