वॉटरबरी : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी कनेक्टिकट राज्यातील एक औद्योगिक शहर. लोकसंख्या १,०८,९६१ (१९९०). न्यू हेवन परगण्यातील हे शहर न्यू हेवनच्या वायव्येस सु. ३० किमी. वर नॉगॅटक व मॅड ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने कनेक्टिकट राज्यातील हार्टफर्ड, न्यू हेवन व ब्रिजपोर्ट या शहरांनंतर वॉटरबरीचा चौथा क्रमांक लागतो. शहराच्या पूर्व-पश्चिमेस ग्रॅनाइट दगडांच्या टेकड्या आहेत. शहरातून न्यू हेवन व हार्टफर्ड या शहरांकडे लोहमार्ग जातात.

अमेरिकन इंडियन या शहरास प्रथम ‘मॅटॅटाकॉक’ (वृक्षहीन प्रदेश) व नंतर संक्षेपाने ‘मॅटॅटक’ या नावाने संबोधत होते. १६५७ मध्ये इंडियनांनी गोऱ्या लोकांना करारान्वये वसाहतीकरिता येथे जागा दिली. उंचवट्याच्या पठारी भागात ही वसाहत असल्याने ‘टाउन प्लॉट’ या नावानेही ती प्रसिद्ध होती (१६७४). फार्मिंग्टन शहरापासून मॅटॅटकची वेगळी वसाहत होऊन तिला शहराचा स्वतंत्र दर्जा मिळाला (१६८६). फिलिप (१६३९-७६) या अमेरिकन इंडियन प्रमुखाने इंडियनांच्या भूमवरील ब्रिटिश वसाहतकऱ्यांचे आक्रमण सहन न होऊन त्यांच्याशी १६७५-७६ मध्ये युद्ध केले, ते किंग फिलिपचे युद्ध म्हणून ओळखले जाते. या युद्धात ही वसाहत नष्ट झाली आणि नदीच्या पूर्व भागात उभारण्यात आलेल्या नवीन वसाहतीला सांप्रतचे नाव मिळाले. विपुल प्रमाणात झालेले जननिःसारित क्षेत्र म्हणूनही तिला ‘वॉटरबरी’ हे नाव पडले असावे. १८५३ मध्ये यास नगराचा दर्जा मिळाला. एकोणिसाव्या शतकात याच्या औद्योगिक विकासास, विशेषतः पितळी वस्तूंच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे, उत्तेजन मिळून शहराची भरभराट झाली. पितळकामाच्या प्रमुख उद्योगामुळे हे शहर सबंध देशात विख्यात झाले.

आसमंतीय भागात नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल असूनही येथील लोकांना मुख्यतः शेतीवरच अवलंबून रहावे लागे. १६९१ मधील महापूर तसेच १७१२ मधील मोठ्या प्रमाणावरील रोगराई या आपत्तींना येथील लोकांना तोंड द्यावे लागले. १९०२ मध्ये शहराचा प्रमुख व्यापारी भाग आगीच्या महापुरामुळे भक्ष्यस्थानी पडला, तर १९५५ मध्ये पुन्हा आलेल्या प्रचंड महापुरामुळे मालमत्तेचे अपरिमित नुकसान झाले होते. राज्यशासनाने त्यानंतर शहराची पुनश्च उभारणी केली.

वॉटबरीमध्ये जोसेफ हॉपकिन्स याने १७५० मध्ये विविध पितळी बटनांच्या उत्पादनास प्रारंभ केला. त्यानंतर सु. ५० वर्षांनी येथे पितळवस्तूंच्या निर्मितीचा पहिला कारखाना उभारण्यात आला. यायोगे वॉटरबरीची पितळवस्तुनिर्मिती केंद्र म्हणून जगभर ख्याती झाली. येथील ओतभट्‌ट्यांमध्ये पितळ व कासे यांचे उत्पादन करण्यात येऊन त्यांवर प्रक्रिया केली जाते त्यांपासून पत्रे, सळ्या-नळ्या इ. तयार करण्यात येतात. येथील कारखान्यांमधून ॲल्युमिनियम, पोलाद, मिश्रधातू इ. वर प्रक्रिया करण्यात येते. यांखेरीज येथे चाकू, सुऱ्या, बटने, धातूच्या लवचिक नळ्या, यंत्रे व सुटे भाग, रसायने, दूरचित्रवाणीचे सुटे भाग, ध्वनिउपकरणे, वीजसामान, सूक्ष्म उपकरणे, वस्त्रे व कापड, प्लॅस्टिके, शीडनौका, काचसामान, तंबाखू-पदार्थ इत्यादींचे निर्मितिउद्योग आहेत. वॉटरबरी येथे घड्याळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. ‘वॉटरबरी’ व ‘डॉलर’ ही प्रसिद्ध घड्याळे येथे तयार करण्यात येत असत. १८०२ मध्ये घड्याळ उत्पादनाकरिता जेम्स हॅरिसन याने येथे पाणचक्कीपासून मिळणाऱ्या शक्तीचा उपयोग केला. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धकाळात युद्धसामग्री उत्पादन करण्यातही या शहरातील अनेक कारखान्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला होता.

सांस्कृतिक व शैक्षणिक दृष्टींनीही शहराचा विकास झाला आहे. येथे ख्रिस्ती धर्मसंस्थांनी चालविलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा असून काही सार्वजनिक शाळाही आहेत. सेंट मार्गारेट्स स्कूल (स्था. १८६५) व मॅक्टेर्नन स्कूल (स्था.१९१२) या अनुक्रमे मुलींच्या व मुलांच्या खाजगी शाळा आहेत. ‘सिलास ब्रॉन्सन पब्लिक लायब्ररी’ (स्था. १८७०) या ग्रंथालयामार्फत अनौपचारिक शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. या संस्थेच्या ग्रंथालयात १,६०,००० ग्रंथ असून त्याच्या पाच शाखा कार्यरत आहेत. मॅटॅटक ऐतिहासिक संस्थेमार्फत (स्था. १८७७) वसाहतकालीन संग्रह व विविध घराण्यांच्या वंशावळी यांची माहिती उपलब्ध करून देण्यात येते, तसेच एक बालसंग्रहालयही चालविले जाते. १६९१ मध्ये येथे पहिले चर्च बांधण्यात आले. शहरात कनेक्टिकट विद्यापीठ-शाखा, मॅटॅटक कम्यूनिटी कॉलेज (१९६७), पोस्ट-जूनिअर कॉलेज (१८९०) ही महाविद्यालये, वॉटरबरी स्टेट टेक्निकल इन्स्टिट्यूट (१९६४) ही तंत्रशिक्षणसंस्था इ. शैक्षणिक सुविधा आहेत.

दळवी, र. कों.