दूशान्बे : स्टालिनाबाद. आशियाई रशियाच्या ताजिकिस्तान प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या ४,३६,००० (१९७५). गीसार खोऱ्यात ताश्कंदच्या दक्षिणेस ३२२ किमी. व्हर्‌झॉप (दूशान्बिका) नदीकाठी वसले असून १९२९ पर्यंत दूशान्बे, तर १९६१ पर्यंत स्टालिनाबाद म्हणून ओळखले जात होते. प्राचीन काळातील तीन वसाहतींपैकी दूशान्बेताजिक या मोठ्या वसाहतीच्या अवशेषांवर हे उभारले आहे. १९२० मध्ये लाल सैन्याने यावर हल्ला केला होता. १९२४ मध्ये हे ताजिकिस्तानची राजधानी म्हणून निवडले. हे लोहमार्ग, वायुमार्ग व राष्ट्रीय महामार्गाचे केंद्र असून कापूस, रेशीम यांच्या गिरण्या मांस डबाबंदी, कातडी कमावणे, रम व इतर प्रकारची दारू गाळणे,यंत्रे व त्यांचे सुटे भाग तयार करणे, तंबाखूवरील प्रक्रिया, कृषी अवजारे बनविणे वगैरे उद्योग येथे चालतात. जवळच्या व्हर्‌झॉप नदीवर जलविद्युत् प्रकल्प आहेत. येथे ताजिक विज्ञान अकादमी (१९५१), ताजिक लेनिन स्टेट विद्यापीठ (१९४८), शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय, वैद्यक व कृषी महाविद्यालये आहेत. लांब व रुंद रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा झाडे, प्रशस्त चौक, उद्याने यांनी शहर सुशोभित झाले आहे.

लिमये, दि. ह. गाडे, नामदेव