रोझो : वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील विंडवर्ड बेटांपैकी कॉमनवेल्थ ऑफ डोमिनिका या ३ नोव्हेंबर १९७८ रोजी स्वतंत्र झालेल्या प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या २०,००० (१९८१ अंदाज). हे डोमिनिका बेटाच्या नैर्ऋत्य भागात कॅरिबियन समूद्र किनाऱ्यावर, रोझो नदीच्या मुखाशी वसलेले आहे. १६३३ मध्ये फ्रेंच वसाहतवाल्यांनी रोझोची स्थापना केली. सुरुवातीला ‘शार्लट टाउन’ या नावाने हे नगर ओळखले जाई. १७८३ पर्यंत याच्या मालकी हक्काबाबत फ्रेंच व इंग्रज यांच्यात वाद सुरू होता. १७८३ मध्ये हे ब्रिटिशांच्या ताब्यात आले. १८०५ मध्ये फ्रेंचांनी याची जाळपोळ केली. फ्रेंच भाषेत रोझो म्हणजे ‘वेत’ (रीड). येथे वेताची वाढ चांगल्या प्रकारे होत असल्याने फ्रेंचांनी याला सांप्रतचे नाव दिले. डोमिनिका बेटावरील हे महत्त्वाचे बंदर असून तेथून लिंबे, लिंबांचा रस, केळी, लिंबू जातीची फळे, तेले, भाजीपाला, मसाल्याचे पदार्थ यांची निर्यात केली जाते. रोमन कॅथलिक चर्च, सेंट जॉर्जेस चर्च (अँग्‍लिकन), शासकीय भवन, व्हिक्टोरिया मिमॉरिअल म्यूझीयम (व्हिक्टोरिया स्मारक संग्रहालय) या येथील उल्लेखनीय वास्तू आहेत. वनस्पतिउद्याने, धबधबे व उष्ण पाण्याचे झरे ही नगरातील व परिसरातील प्रमुख आकर्षणे होत.

चौधरी, वसंत