ईग्वासू : ब्राझील-अर्जेंटिना सरहद्दीवर, ईग्वासू-पाराना संगमापासून २२·५ किमी. वरच्या बाजूस, २५°४१’ द. व ५४° २७’ प. येथे, सु. ७० मी. उंचीचा व ४ किमी. रुंदीचा हा धबधबा म्हणजे पाराना पठाराच्या वेड्यावाकड्या सीमेवरून कोसळणारे, अरण्ययुक्त खडकाळ बेटांमुळे वेगवेगळे झालेले सु. २७५ प्रपात होत. येथे दोन्ही देशांची राष्ट्रीय उद्याने असून, दक्षिण अमेरिकेतील हे निसर्गसुंदर दृश्य पाहण्यासाठी अर्जेंटिनाहून पाराना नदीतून, ब्राझीलमधील रस्त्याने किंवा विमानांनी हौशी प्रवासी येतात. ह्याची प्रचंड व सुप्त जलविद्युत्‌जननशक्ती अद्याप अविकसित आहे. 

कुमठेकर, ज. ब.