जॉर्जटाउन–१ : गुयानाची राजधानी व सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या ६६,०७० (१९७०). डेमरारा नदीच्या मुखावर वसलेल्या या शहराचे डच नाव स्टाब्रुक होते. १८२२ साली नेपोलियन विरुद्धच्या युद्धात ते ब्रिटिशांनी घेतले आणि त्यास आपल्या राजाचे नाव दिले. समुद्रकिनाऱ्यावर सखल भागात वसल्याने भरतीपासून संरक्षण म्हणून मोठी भिंत बांधावी लागली आहे. या शहरातील रस्ते रुंद असून त्यांच्या कडेला छायावृक्ष आहेत. काहींच्या मधून डचांच्या वेळचे कालवे अद्याप वाहतात. त्यांवर वाढलेल्या फुलांच्या पाणवेली मनोहर दिसतात. बहुतेक घरे व इमारती लाकडी आहेत. जुलै १९४५ मध्ये आगीने या शहराचे बरेच नुकसान झाले. भातगिरण्या व सिगार, चॉकोलेट, मेणबत्त्या वगैरेंचे कारखाने या शहरात असून देशातील साखर, रम, लाकूड, नारळ, सोने, हिरे व बॉक्साइटची बाजारपेठ हीच होय. बंदरामध्ये जहाज दुरुस्तीकरिता धक्‍क्याची सोय आहे. मूळचे भारतीय लोक येथे बरेच असून त्यांनी शहरात आपले मोहल्ले बांधले आहेत.

शहाणे, मो. ज्ञा.