तेलंगण : (तेलिंगाण, तेलिंगा, त्रिलिंग). द. भारतातील एक प्रदेश. या प्रदेशात डोंगरावर कालेश्वर, श्रीशैलम्‌, भीमेश्वर (द्राक्षाराम) ही तीन प्रसिद्ध शिवतीर्थे असल्यामुळे यास तेलिंगा–त्रिलिंग असेही म्हणतात. तेलंगण हा त्या नावाचा अपभ्रंश असावा. हा प्रदेश तमिळनाडू राज्याच्या उत्तर ईशान्येस आणि हैदराबादच्या दक्षिणेस व पूर्वेस पसरलेला आहे. येथे तेलुगू भाषा प्रामुख्याने बोलली जाते. या प्रदेशावर इ. स. पू. तिसरे शतक ते इ. स. तिसऱ्या शतकापर्यंत बौद्ध धर्मीय आंध्र राजांची सत्ता होती. तसेच तेलंगण हा बहमनी राज्यातील तेलुगू भाषिक सुभा होता. गोदावरी नदी ही कलिंग देश व तेलंगण यांच्यामधील सीमा मानण्यात येत असे.

प्रथम मुसलमानांनी ढोबळमानाने मद्रास इलाख्याच्या ईशान्येस असलेल्या या तेलुगू भाषिक प्रदेशाला तेलंगण ही संज्ञा दिली होती. त्यास आंध्र असेही म्हणतात पण काही वेळा कलिंग देश आणि आंध्र राजांनी जिंकलेले प्रदेश यांसही आंध्र म्हटले जात असे. जर्मन प्राच्यविद्यापंडित कोनरात पॉइटिंगर याच्या ‘पॉइटिंगर कोष्टका’त कलिंगचा उल्लेख नसून ‘आंद्री इंडी’ या बोलीचा उल्लेख आहे परंतु टॉलेमी आंध्र ऐवजी कलिंगचा उल्लेख करतो (इ. स. १५०). पुराणांप्रमाणेच प्लिनी व ह्युएनत्संग यांच्या प्रवासवृत्तांतात कलिंग व आंध्र या दोन्हींचा उल्लेख आढळतो.

१८५७ च्या उठावानंतर तेलंगणचा प्रदेश हैदराबाद संस्थानात समाविष्ट करण्यात आला. तेलंगण प्रदेशाचे स्वतंत्र राज्य व्हावे (राजधानी हैदराबाद) असा प्रयत्न चेन्ना रेड्डी प्रभृतींनी केला पण तो सफल झाला नाही. शेवटी राज्य पुनर्घटना–समितीच्या शिफारशींनुसार नोव्हेंबर १९५६ मध्ये आंध्र (११ जिल्हे) आणि तेलंगण (९ जिल्हे) मिळून आंध्र प्रदेश राज्य स्थापन झाले. तथापि आंध्रमधून तेलंगण विभक्त करण्याची चळवळ अद्यापि चालू आहे.

कांबळे, य. रा.