शँटुंग : चीनच्या ईशान्य भागातील एक किनारवर्ती प्रांत. शँडाँग (पूर्वेकडील पर्वतीय प्रदेश) म्हणूनही तो ओळखला जातो. याचे एकूण क्षेत्रफळ १,५३,३०० चौ.किमी. लोकसंख्या ८,७३,८०,००० (१९९६ अंदाज). शँटुग द्वीपकल्प व अंतर्गत प्रदेश, असे या प्रांताचे दोन भाग पडतात. अंतर्गत प्रदेशाच्या उत्तरेस आणि पश्चिमेस होपे, नैर्ऋत्येस होनान, तर दक्षिणेस आन्हवे व जिआंगसू हे प्रांत आहेत. शँटुग द्वीपकल्पाच्या उत्तरेस चिहली आखात, तर पूर्वेस व दक्षिणेस पीत समुद्र आहे. एकेकाळी हा प्रदेश बेटाच्या स्वरूपात होता. परंतु ह्‌वांग हो नदीच्या वारंवार पात्र बदलामुळे व दीर्घकालीन गाळाच्या संचयनामुळे तो मुख्य भूमीला जोडला गेला. चिनान तथा जीनान (लोकसंख्या २०,५०,०००– १९९३) ही प्रांताची राजधानी आहे.

शँटुगच्या अंतर्गत भागाने एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे दोन तृतीयांश क्षेत्र व्यापले आहे. याच्या मध्यवर्ती व आग्नेयीकडील भागात ताइशान पर्वतीय प्रदेश आहे. या पर्वताची उंची १,५२० मी. पर्यंत आढळते. त्याचा उत्तर, पश्चिम आणि दक्षिण भाग सुपीक आणि सखल आहे. उत्तर चिनी मैदानाचाच हा विस्तारित भाग आहे. पश्चिम भागातून ‘ग्रँड कालवा’ हा कृत्रिम जलमार्ग जातो. चिहली आखाताला मिळण्यापूर्वी ह्‌वांग हो नदी शँटुग प्रांतातून नैर्ऋत्य-ईशान्य दिशेस वाहत जाते. १८५२ पूर्वी ही नदी शँटुगच्या दक्षिणेकडून पीत समुद्राला मिळत होती. शँटुग द्वीपकल्पीय प्रदेश हा संपूर्ण उच्चभूमी प्रदेश असून, त्याचा किनारा दंतुर आहे.

शँटुगचे हवामान सामान्यपणे खंडीय प्रकारचे असले, तरी द्वीपकल्पीय व अंतर्गत प्रदेश यांच्या हवामानात भिन्नता आढळते. अंतर्गत प्रदेशात हिवाळे अधिक कडक असतात. वसंत ऋतूत धुळीची वादळे निर्माण होतात. कधी कधी अवर्षणाची परिस्थिती निर्माण होते. द्वीपकल्पीय प्रदेशातील हवामान मात्र सौम्य असते. या भागात सागरी धुके आणि उच्चतम आर्द्रता नेहमीच आढळते. जीनान येथील जानेवारीचे सरासरी तापमान –१० से., तर जुलैचे सरासरी तापमान २८० से. आढळते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६३सेंमी. असून त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक पाऊस जुलैमध्ये पडतो.

ख्रिस्तपूर्व तिसऱ्या सहस्रकात येथील द्वीपकल्पीय प्रदेशात उत्तरकालीन पाषाणयुगीन लोकवस्ती होती. इ.स.पू. ७७०–४७६ या काळात शँटुग हे राजकीय व लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र होते. ‘लू’ हे शँटुगमधील सर्वांत दक्षिणेकडील एक छोटेसे राज्य होते. चिनी तत्त्ववेत्ते कन्फ्यूशस (इ.स.पू. ५५१–४७९) व मेन्सियस (इ.स.पू. सु.३७१ – सु.२८९) यांची ‘लू’ ही जन्मभूमी. सुरुवातीच्या सहा राजवंशांच्या कारकीर्दीत (इ.स. २२०–५८९) शँटुग हे उत्तर चीनचे सागरी व्यापार व आरमाराचे प्रमुख केंद्र बनले. सतराव्या शतकात चिंग (मांचू) राजवटीत या प्रांताची स्थापना झाली. एकोणिसाव्या शतकात ह्‌वांग हो नदीच्या बदलत्या पात्रामुळे पूर व धूपविषयक समस्या तीव्र होऊन परिसरातील कृषिक्षेत्राची मोठी हानी झाली. इ.स. १८५५ मध्ये एकामागून एक असे प्रचंड पूर आले. परिणामतः शँटुगमधील शेतकऱ्यांनी मॅंचुरिया व इनर मंगोलियाकडे स्थलांतर केले. १८५८ मध्ये डेंगजो (पंगलाई) हे बंदर युरोपीयांना व्यापारासाठी खुले करण्यात आले व एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात हा प्रांत जर्मन, ब्रिटिश व जपान यांच्या प्रभावाखाली आला. १८९८मध्ये जर्मनीने ‘जीआउजो’ उपसागराच्या सभोवतालचा भूप्रदेश भाडेपट्ट्याने घेतला. त्याच वर्षी ब्रिटनने ‘वेहाइव बंदर’ भाडेपट्ट्याने घेतले. पहिल्या महायुद्धकाळात जपानने जर्मनीकडील प्रदेश बळकावला. पुढे १९२२ पर्यंत जपानने येथील प्रदेशावरील आपला हक्क सोडून दिला. त्यानंतर ब्रिटननेही आपला हक्क सोडला. चीन-जपान युद्धकाळात (१९३७–४५) संपूर्ण शँटुग प्रांताचा ताबा जपानने घेतला. मात्र १९३८ मध्ये ताइरच्वांग येथे झालेल्या युद्धात जपानला हार पतकरावी लागली. १९४८ पासून शँटुग प्रांत चिनी कम्युनिस्ट सत्तेखाली आला.

शँटुगचा उत्तरेकडील व पश्चिमेकडील भाग शेतीच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे तर उर्वरित प्रदेश खाणकाम व मासेमारीसाठी महत्त्वाचा आहे. गहू, सोयाबीन, तृणधान्ये, ज्वारवर्गीय धान्य, मका, रताळी ही प्रमुख खाद्यपिके तर कापूस, तंबाखू, भुईमूग व फळे ही प्रमुख नगदी पिके घेतली जातात. भुईमूग उत्पादनात हा देशातील अग्रेसर प्रांत आहे. सप्ताळू, नासपती, जरदाळू सफरचंद, द्राक्षे, कलिंगड, खजूर इ. फळांचे उत्पादन या प्रांतात होते. प्राचीन काळापासून हा प्रांत रेशीम उत्पादनासाठी महत्त्वाचा आहे. येथे कृषिमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा बराच विकास झाला आहे.

सागरी मासेमारीतही हा प्रांत आघाडीवर आहे. सत्तरपेक्षा अधिक बंदरे त्यात गुंतली आहेत. चिंगडाऊ, चीफू, वेहाई, शिहताओ व लुंगजो ही त्यांपैकी प्रमुख मासेमारी बंदरे आहेत. ईल, हेरिंग, गिझर्डशॅड, फिश-रो इ. जातींचे मासे तसेच कोळंबी आणि खेकड्यांच्या अनेक जाती येथे आढळतात.

शँटुगमधील खाणकाम व्यवसायही मोठा आहे. त्यातून कोळसा, लोह-खनिज, बॉक्साइट, सोने व खनिज तेल यांचे उत्पादन होते. पोशान व त्झूपो ही खाणकामाची प्रमुख केंद्रे आहेत. द्वीपकल्पीय प्रदेशाच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यावर मिठाचे उत्पादन होते.

सुती व रेशमी कापड, औद्योगिक रसायने, खते, यंत्रसामग्री, कृषिअवजारे, शास्त्रीय उपकरणे, कागद, मौल्यवान खडे इत्यादींचे उद्योगधंदे प्रांतात चालतात. चिंगडाऊ, जीनान, त्झूपो व बेफँग ही येथील प्रमुख औद्योगिक नगरे आहेत. बिअर उत्पादनासाठी चिंगडाऊ हे शहर पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. लोहमार्ग हे वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. महामार्ग व इतर रस्ते लोहमार्गांना पूरक ठरले आहेत. १९४९ पासून अंतर्गत जलवाहतुकीत बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहेत.

शँटुगमधील लोक प्रामुख्याने उत्तर चिनी मँडरीन भाषा बोलणारे व हानवंशीय आहेत. प्रांताच्या वेगवेगळ्या भागांत काही चिनी मुस्लिम लोकही आढळतात. नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त लोक ग्रामीण भागात राहतात. चिंगडाऊ व जीनान ही दोन सर्वांत मोठी शहरे असून त्झूपो हा नगरसमूह खाणकामाचा औद्योगिक पट्टा आहे. ताइआन शहराजवळील ताइशान पर्वताला प्राचीन काळापासून बौद्ध व ताओ-पंथीय लोक पवित्र मानतात. चीनमधील हे सर्वांत पवित्र स्थान आहे.      

                                                                                                                           

चौधरी, वसंत