ॲरास : उत्तर फ्रान्समधील पा द काले प्रांताची राजधानी. लोकसंख्या ४९,१४४ (१९६८). स्कार्प नदीकाठी, लील शहराच्या नैर्ऋत्येस ४० किमी. वर हे असून महत्त्वाच्या सडकांचे हे केंद्र आहे. धान्य व्यापारामुळे व मद्य, कापड, शेतीची अवजारे, बीट साखर, सायकली, मोटारसायकली, सिमेंट आदींच्या कारखानदारीमुळे ॲरासची गणना फ्रान्सच्या महत्त्वाच्या शहरांत होते. ॲरासचे कलाकुसरीचे टेपेस्ट्रीचे कापड पूर्वीपासूनच यूरोपात प्रसिद्ध आहे. येथील संग्रहालयात जुन्या विणकामाचे नमुने व फ्रेंच चित्रांचा चांगला संग्रह असून ग्रंथालयात जुनी हस्तलिखिते आहेत. सीझरने हे शहर तेथील अँट्रेबेट्स नामक रहिवाशांकडून घेतले हूणांनी याचा नाश केला होता. मध्ययुगात हे अनुक्रमे फ्लँडर्स, बर्गंडी, स्पेन आणि फ्रान्स ह्यांच्या अंमलाखाली होते. शतसांवत्सरिक युद्धानंतरचा इंग्‍लंड व फ्रान्स यांचा तह येथेच झाला. दोन्ही महायुद्धांत येथील प्राचीन व प्रसिद्ध इमारतींचे अतोनात नुकसान झाले, तरी शहराचे काहीसे प्राचीन स्वरूप दक्षतेने टिकविण्यात आले आहे. क्रांतिकारक रोब्झपीअरचे जन्मस्थान म्हणूनही याला महत्त्व आहे. पहिल्या महायुद्धातील एप्रिल-मे १९१७ मधील येथील लढाईत ब्रिटिश व जर्मन फौजांची तीन लाखांवर हानी झाली. त्या घटनेचे स्मारक येथे आहे.

ओक, द. ह.