तार्नूफ : दक्षिण पोलंडमधील क्रेको प्रांतातील औद्योगिक शहर. लोकसंख्या ८५,५०० (१९७०). हे क्रेकोपासून ७२ किमी. व्हिश्चला नदीची उपनदी डूनायेत्स आणि बीआल यांच्या संगमाजवळ असून प्रिझमसिल ते लवूफ लोहमार्गावरील प्रस्थानक आहे. यंत्रे व रासायनिक पदार्थ यांशिवाय लाकूड कापणे, धान्य दळणे, कातडी व काच सामान, मद्य, लेस, भरतकाम, विणकाम, विटा इ. व्यवसायही येथे आहेत. येथे पंधराव्या शतकातील नगरभवन, प्रार्थनामंदिर, जुने अवशेष व दोन संग्रहालये आहेत. १३३० मध्ये तार्नोफ्स्की घराण्याने बसविलेले हे गाव पंधराव्या शतकात आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. पुनः उभारल्यानंतर ते सांस्कृतिक केंद्र बनले व १७७२ मध्ये ऑस्ट्रियाकडे गेले. दुसऱ्या महायुद्धात येथील सर्व उद्योग नष्ट झाले. युद्धानंतर ते शहर पुन्हा पोलंडला मिळाले.

लिमये, दि. ह.