बैकल सरोवर :  जगातील सर्वात खोल असे आग्नेय सायबीरियातील (रशिया) प्रसिद्ध सरोवर. जगातील गोड्या पाण्याच्या विशाल सरोवरांपैकी हे ६व्या क्रमांकाचे आहे. त्याचे क्षेत्रफळ ३१,५०० चौ. किमी. असून लांबी सु. ६३६ किमी रूंदी ८० किमी. आणि कमाल खोली १,७४२ मी. आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील व रशियामधील ण्कूण गोड्या पाण्यापैकी अनुक्रमे सु. २० व ८० टक्के गोडे पाणी बैकल सरोवरात आहे. बैकल सरोवर डोंगरांनी वेढलेले असून त्यंतील काहींची उंची सु. २,००० मी. पर्यंत आहे. त्यांमधून उगम पावणाऱ्या व वैकलता मिळणाऱ्या सु ३३६ नद्या व प्रवाह यांपैकी सेलेंगी, बार्गुझीन, अंगारा (अपर तंगुस्का), तुर्का व स्नेझ्नाया हा नद्या महत्वाच्या आहेत. ह्यातून एगम पावणारी अंगारा ही नदी येनेसी नदीस मिळते. बैकल सरोवरात २७ बेटे असून त्यांपैकी पाच बेटे काही काळ जलमग्न असतात. ओल्‌खॉंन (७५१ चौ. किमी. क्षेत्रफळ) व बोल्शॉय उश्‌केनी (७.७ चौ. किमी.) ही सर्वात मोठी बेटे आहेत. बैकल हे मायोसीन वा जुरासिक काळापासून अस्तित्वात असावे. १६४३ मध्ये रशियनांनी या सरोवराचा शोध लावला.

भूविज्ञानदृष्ट्या हा प्रदेश कॅलेडोनियन घड्यांचा असेन या घड्या निर्माण झाल्या, त्यावेही खचदऱ्याही तयार झाल्या यांपैकी खोल खवदऱ्यांचा भाग बैकल सरोवराने व्यापला. बैकलचे पाणी डिसेंबर ते मे यांदरम्यान गोठते. ऑगस्टमध्ये यातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सु. १३० से. असते, तर किनाऱ्यापासून दूरवरच्या उथळ भागात ते २०० से. पर्यंत जाते. बैकल सरोवराच्या पाण्यामुळे किनारी प्रदेशात उन्हाळे व हिवाळे सौम्य राहतात. सरोवरात अनेकइा अचानक वादळे उद्‌भवल्याने सु. ४.५७ मी. उंचीच्या लाटा निर्माण होतात. त्यांमुळे नौवहनात अडचणी येतात. याच्या परिसरात कित्येकदा भूकंपही होतात. बैकलचे पाणी, विशेषतः मे महिन्यात, इतके निळेशार व स्वच्छ असते की, ३९.६ मी. खोलीपर्यंतचा भाग स्वच्छ व स्पष्ट दिसू शकतो .

बैकल सरोवरातील पाणीजीवन व वनश्री समृद्ध आहे. सरोवरात १,२०० हून अधिक जातींचे जलचर, तर सरोवरपरिसरात सु. ६०० वनस्पती आणि सु. ३२६ प्रकारचे पक्षी आढळतात. यांपैकी सु. ७५ टक्के प्राणी व वनस्पती बैकल सरोवरप्रदेशाातीलच आहेत. बुलहेड, ओमुल सॅमन, ग्रेलिंग, लोक व्हाइटफिश, स्टर्जन तसेच बैकल सील व ग्लोम्यानका हे विशिष्ठ प्रकारचे मासे येथे आढळतात.

बैकलच्या किनारी प्रदेशात खाणकाम (अभ्रक व संगमरवरी दगड), सेल्यूलोज व कागद, जहाजबांधणी, मासेमारी, लाकुडतोड इ. उद्योग चालतात. लिस्टव्ह्यान्का, बाबुश्‌किन, उस्त-बार्गुझीन, निश्ने-अंगार्स्क ही सरोवरप्रदेशातील महत्वाची बंदरे स्टीमर-सेवेने एकमेकांशी जोडलेली असून या बंदरांतून चहा, सीडार फळे, लोकर, लाकुड, सोडा, मीठ, धान्ये इ. चा व्यापार चालतो. बैकल सरोवराचा रम्य व सुंदर परिसर तसेच गऱ्याचीन्स्कव ,खाकुसी येथील औषधी पाण्याचे झरे यांमुळे पर्यटकांची येथे वर्दळ असते. डिसेंबर-मे यांदरम्यान सरोवरातील पाणी गोठते या काळात सरोवरातुन संचार करण्यासाठी बर्फावरील घसरगाडीचा वापर करण्यात येतो. सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळून ⇨ ट्रान्स-सायबीरियन रेल्वे  जाते.

लिस्टव्ह्यान्का शहरात रशियाच्रूा विज्ञान अकादमीची एक शाखा असून तिच्याद्वारे गोड्या पाण्याच्या सरोवरासंबंधी संशोधन केले जाते. शहरात बैकल आरोग्यभुवन ही संस्था आहे. बोल्शीये कोटी या शहरात एक जलजीवविज्ञानकेंद्र आहे.

गद्रे, वि. रा.