ग्रँड कालवा : (१) चीनमधील व जगातील सर्वांत प्राचीन व लांब कालवा. पीकिंगच्या पूर्वेस २४ किमी. वरील तुंगजो ते शांघायच्या नैर्ऋत्येस १६o किमी.वरील हांग्‌जोपर्यंत सु. १,९३o किमी. लांबीचा हा कालवा चीनमधील एकमेव दक्षिणोत्तर जलमार्ग आहे. याचा ह्‌वांगहोवरील जिंगजीआंग ते यांगत्सीवरील ग्वेजोपर्यंतचा काउयू सरोवराच्या पूर्व किनाऱ्यावरून जाणारा मध्यभाग इ.स. पू. ४८६ मध्ये पुरा झाला. हांग्‌जो ते कशिंग, सूजो, वूशी, वूजिन इ. वरून जिंगजीआंगपर्यंत सुपीक प्रदेशातून जाणारा दक्षिणभाग ६o५ ते ६१८ मध्ये सम्राट यँगतीच्या अमदानीत खोदला गेला. काठांवरील वृक्षाच्छादित राजरस्ते, टपालचौक्या व आरामगृहे यांमुळे प्रवास सुखावह होई. यांगत्सीच्या खोऱ्यातून तांदळाच्या रूपाने मिळणाऱ्या खंडणीची वाहतूक या मूळ हेतूवरून याला युंग लियांग (धान्य वाहतूक नदी), युन हो (वाहतूक नदी), यु हो (साम्राज्य नदी) इ. नावे पडली. कालांतराने डागडुजीअभावी गाळ साचून याची उपयुक्तता कमी झाली. कूब्लाईखानाने १२८९ मध्ये दुरुस्ती करून त्सिनिंग-लिन्चँग यावरून तिन्‌त्सिन, तुंगजोपर्यंतचा याचा उत्तरभाग खोदविला. हा कालवा ३o ते ६o मी. रुंद आणि o·६ मी. ते ४·६ मी. खोल असून काही ठिकाणी धरणे व दरवाजे बांधून नौकासुलभतेसाठी यातील पाण्याची पातळी पुरेशी राखली आहे. कम्युनिस्ट राजवटीत ग्रँड कनॅल कमिटीने १९६३ मध्ये उत्तर जिआंगसू प्रांतात सु. ४oo किमी. भाग नौकासुलभ केला. लोहमार्ग व सडका यांमुळे महत्त्व कमी झाले आणि लोकसंख्या वाढीमुळे धान्य वाहतूक मागे पडली, तरी कोळसा व इतर औद्योगिक माल यांच्या वाहतुकीस कालवा आजही उपयोगी आहे. या कालव्यामुळे देशाच्या दक्षिण व उत्तर भागांचे एकीकरण अनेकदृष्ट्या सुलभ झाले.

(२) व्हेनिसमधील मुख्य कालवा व आयर्लंडमधील डब्लिन ते बॅलिनस्लो कालवा हेही ग्रँड कनॅल या नावाने ओळखले जातात.

ओक, द. ह.