नेब्रॅस्का : अमेरिकेच्या पश्चिम-उत्तरमध्य भागातील एक राज्य. क्षेत्रफळ २,००,०१७ चौ. किमी. पैकी १,८१० चौ. किमी. पाण्याखाली. लोकसंख्या १५,४६,००० (१९७५ अंदाज). विस्तार ४०° उ. ते ४३° उ. व ९५° २५′ प. ते १०४° प. यांदरम्यान. याच्या उत्तरेस साउथ डकोटा, पूर्वेस आयोवा व मिसूरी, दक्षिणेस कॅनझस व कोलोरॅडो आणि पश्चिमेस वायोमिंग ही राज्ये असून, लिंकन ही राज्याची राजधानी आहे.
भूवर्णन : उत्तर अमेरिकेतील ग्रेट प्लेन्स या विस्तीर्ण मैदानी प्रदेशाच्या मध्याजवळचा हा ऊर्मिल व गवताळ प्रदेश, पूर्वेच्या मिसूरी नदीकडून वायव्येच्या कोलोरॅडो-वायोमिंग पठारी सीमेकडे २५६ मी. पासून १,६५० मी. पर्यंत उंचावत गेला आहे. पश्चिमेकडे रॉकी पर्वताच्या पायथ्यापर्यंत उंच पठारे व टेकड्या आहेत. पूर्वेकडील वातोढ (लोएस) प्रदेश, मध्यातील वाळू-टेकड्यांचा प्रदेश व पश्चिमेकडील उंच मैदानी प्रदेश असे या राज्याचे सामान्य स्वरूप आहे. उत्तर सीमेवर साउथ डकोटाच्या उत्खनन भूमीचा दोन जागी डोकावणारा पिअरी हिल्स हा भाग आहे.
नद्या : नेब्रॅस्का राज्य पूर्णपणे मिसूरीनदीक्षेत्रात मोडते. तिची मुख्य उपनदी प्लॅट ही राज्याच्या मध्य भागातून पूर्वेकडे वाहत जाऊन ओमाहाच्या दक्षिणेस मिसूरीला मिळते. उत्तरेची निओब्रॅरा आणि दक्षिणेच्या काही भागात येऊन जाणारी रिपब्लिकन या इतर प्रमुख नद्या आहेत. नद्या, त्यांच्या उपनद्या, राज्यातील २,५०० हून अधिक लहानमोठी तळी, उत्तर प्लॅटवरील १४३ चौ. किमी. विस्ताराचा किंग्स्ले धरणाचा व इतर अनेक मानवनिर्मित जलाशय ही राज्याची जलसंपत्ती, सिंचन योजनांनी कारणी लावलेली आहे. राज्याच्या मध्य भागातल्या वाळू-टेकड्या व जमिनीखालचे वाळू-खड्यांचे थर भूमिगत पाण्याने समृद्ध आहेत. त्या पाण्याचा उपयोग विहिरींवरील सिंचन योजनांनी करून घेतलेला आहे.
मृदा : आग्नेयीकडील प्रेअरी आणि ईशान्येकडील चेर्नोझम या प्रकारच्या मृदा मिळून पूर्व भागातील मृदा अन्नधान्यांच्या, विशेषतः मक्याच्या, उत्पादनास फार पोषक आहेत. नैर्ऋत्येकडील व बऱ्याचशा पश्चिम भागातील चेस्टनट मृदा हिवाळी गव्हाच्या उत्पादनास अनुकूल आहेत. मध्य भागातील वाळू-टेकड्यांचा प्रदेश तेथील गवतामुळे पशुपालनास विशेष अनुकूल आहे. मिसूरी व प्लॅट नद्यांच्या खोऱ्यांत जलोढ मृदा असून तेथील उत्पादनास सिंचाईची चांगली सोय आहे.
खनिजे : नेब्रॅस्का खनिजांच्या बाबतीत फारसा समृद्ध नाही. दगड, वाळू, चुनखडी, रेती ही उपयुक्त खनिजे येथे मिळतात. दुसऱ्या महायुद्धानंतर राज्याच्या नैर्ऋत्य भागात सापडू लागलेले खनिज तेल व नैसर्गिक वायू यांची बहुमोल भर पडली आहे.
हवामान : बेताचा पाऊस, कमी आर्द्रता, कडक थंडी व कडक उन्हाळा, वरचेवर बदलणारी हवा आणि वर्षावर्षाला कमी जास्त होणारे सरासरी पर्जन्यमान व तपमान ही या राज्याच्या हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. जुलैचे सरासरी तपमान पश्चिमेकडे २३° से. तर आग्नेयीकडे २६° से. असते. जानेवारीचे सरासरी तपमान पश्चिमेकडे –४° से. ईशान्यकडे–६° से. असते. नैर्ऋत्येकडील उष्ण वाऱ्यांमुळे तापमान पुष्कळदा ३२° से. पर्यंत, तर कधीकधी ३८° से पर्यंतही चढते. हिवाळ्यात वायव्येकडून येणाऱ्या थंड आर्क्टिक वाऱ्यांमुळेतपमान –१८° से. पर्यंत खाली जाते आणि हिमवर्षाव होतो. आग्नेयीकडून येणाऱ्या चक्री वादळांमुळे पुष्कळदा गारांचा वर्षाव होतो व नुकसानही पुष्कळ होते. वर्षातून काही घूर्णवाती वादळेही होतात. किमान निम्म्या नेब्रॅस्काची गणना तरी निमशुष्क प्रदेशात करावी लागेल. सरासरी पर्जन्यमान पूर्वेकडील प्रदेशात ७० सेंमी., मध्य भागात ५६·४ सेंमी., पश्चिम भागात ४५·५ सेंमी. असते.
वनस्पती व प्राणी : ‘तृणसमुद्र’ नाव पडण्याइतके विपुल व विविध प्रकारचे गवत या राज्यात होते. जेमतेम ३% जमीन वनाच्छादित आहे. विशेषतः नद्या-ओढ्यांच्या काठी कॉटनवुड, विलो, एल्म, ॲश व बॉक्स एल्डर ही झाडे आढळतात. पूर्वेकडे काही ओक व वॉलनट, तर पश्चिमेकडे व निओब्रॅराच्या खोऱ्यात पाइन वृक्ष आहेत. पश्चिम-मध्य भागातील वैराण प्रदेशात मुद्दाम झाडे लावून नेब्रॅस्का राष्ट्रीय वनविभागाची वाढ केलेली आहे. बेसुमार अविचारी शिकारीतून वाचलेला रानरेडा आता संरक्षित विभागत आढळतो. बीव्हर, हरिण व मृग हे नष्टप्राय होताहोता पुन्हा भरपूर झाले आहेत. त्यांशिवाय बॅजर, सिव्हिट, खोकड, चिचुंद्री, मिंक, ऑपोसम, ससा, रॅकून, स्कंक, कॉयॉट, खार, प्रेअरी डॉग हे प्राणी आहेत. महोका, लावा, ग्राउज अनेक स्थलांतरी पक्षी तसेच नद्या-तळ्यांतून बदक, पाणकोंबडी व अनेक प्रकारचे खाद्यमासे येथे मिळतात. प्रेअरी रॅटलर हा पश्चिम भागात सरपटताना दिसतो. नाकतोडे कित्येकदा खूप नुकसानी करतात.
इतिहास व राज्यव्यवस्था : नेब्रॅस्काचे आदिवासी आठ वेगवेगळ्या जमातींचे रेड इंडियन होते. १५४१ मध्ये मेक्सिकोतून आलेल्या स्पॅनिश सेनानी कोरोनादोनंतर इकडे येणारे गोरे लोक म्हणजे केसाड कातड्यासाठी १७०० च्या सुमारास मिसूरी नदीमार्गे आलेले फ्रेंच होत. १७६३ मध्ये फ्रान्सकडून स्पेनकडे व १८०१ मध्ये पुन्हा फ्रान्सकडे आल्यावर १८०३ मध्ये लुइझिॲना खरेदीचा भाग म्हणून हा प्रदेश नेपोलियनने अमेरिकेस विकला. १८०४–०६ दरम्यान ल्यूइस-क्लार्क यांची, पश्चिमेकडचा मार्ग शोधण्याची मोहीम या विभागातून जाऊन परत गेली तेव्हा अमेरिकनांचे लक्ष या प्रदेशाकडे विशेष वेधले गेले. प्रथम हा प्रदेश अमेरिकन वाळवंटाचाच एक भाग अशी समजूत होती, केसाळ कातड्याच्या व्यापाराखेरीज इकडे कोणी वळत नव्हते. पण १८३० नंतर पश्चिमेला ऑरेगनकडे जमिनीसाठी, कॅलिफोर्नियाला सोन्यासाठी व उटामध्ये धर्मस्वातंत्र्यासाठी जाणाऱ्या लोकांचा मार्ग या मुलखातून गेला आणि १८४० ते १८६६ पर्यंत २५ लाख लोक हा प्रदेश ओलांडून पश्चिमेकडे गेले. १८४७ मध्ये येथे स्थायी वसाहत झाली. १८५४ मध्ये ४०° अक्षांशापासून उत्तरेस कॅनडाच्या सीमेपर्यंत आणि मिसूरी नदीपासून पश्चिमेस रॉकी पर्वतापर्यंत हा प्रदेश केंद्रशासित झाला. १८६१ साली डकोटा व कोलोरॅडो आणि १८६३ मध्ये आयडाहो हे प्रदेश वेगळे झाल्यानंतर नेब्रॅस्काला सध्याचा भाग उरला. प्रथम राजधानी ओमाहा होती, १८६७ मध्ये राज्याचा दर्जा मिळाल्यावर ती लिंकन येथे आली. यादवी युद्धानंतर इकडे विनामूल्य मिळणाऱ्या जमिनीवर शेती करण्यासाठी माजी सैनिक मोठ्या संख्येने आले. त्याच दिवसात खंडपार लोहमार्ग व त्यापाठोपाठ नवीन वसाहती या राज्यातून होऊ लागल्या. सुरुवातीला नव्या वसाहतवाल्यांना टोळधाडी, तुफाने, अवर्षणे अशा आपत्तीना तोंड द्यावे लागले. १८८० पर्यंत रेड इंडियनांशी लढाया चालल्याच होत्या. रेल्वे वाहतुकीच्या जबर दरांविरूद्ध आणि आधी आलेल्या गुरे पाळणाऱ्यांशी शेतकऱ्यांना लढा द्यावा लागला. १८९० पासून राज्यात सहकारी पद्धत, विशेषतः धान्य साठविण्यासाठी, सुरू झाली होती. मंदीच्या व नुकसानीच्या वर्षात पॉप्युलिस्ट पक्ष निघाला व त्याने राजकीय सत्ताही मिळविली. दुसऱ्या महायुद्धानंतर नेब्रॅस्काला राजकीय स्थैर्य मिळाले.
१८७५ च्या व नंतर अनेक वेळा दुरुस्त झालेल्या संविधानानुसार कार्यकारी व्यवस्था ४ वर्षांसाठी निवडलेला राज्यपाल व ३ खातेप्रमुख शिवाय ४ वर्षांसाठी एक आणि ६ वर्षांसाठी तीन असे आणखी खातेप्रमुख मिळून पाहतात. राज्यकारभाराच्या सोयीसाठी राज्याची ९३ परगण्यांत विभागणी केलेली आहे. १९३४ च्या संविधान दुरुस्तीप्रमाणे १९३७ पासून एकच विधिमंडळ असलेले नेब्रॅस्का हे देशातील एकमेव राज्य आहे. त्याचे ४९ सदस्य पक्षनिरपेक्ष तत्त्वावर ४ वर्षांसाठी निवडलेले असतात. लिंकन येथे विषमांकी वर्षी ९० दिवस व समांकी वर्षी ६० दिवस अधिवेशने भरतात. राष्ट्रसंसदेवर नेब्रॅस्कातर्फे २ सीनेटर व ३ प्रतिनिधी निवडून जातात.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सबंध राज्यातून व सात सहन्यायमुर्ती सहा जिल्ह्यांतून ६ वर्षांसाठी निवडले जातात. २१ जिल्हान्यायालयांचे न्यायाधीश २ ते ४ वर्षांसाठी निवडले असतात. यांशिवाय परगणे, पालिका व स्थानीय न्यायालयांचे न्यायाधिकारी स्थानिक निवडणुकांनी नियुक्त होतात.
आर्थिक व सामाजिक स्थिती : विसाव्या शतकाच्या आरंभी राज्याची स्थिती काहीशी सुधारली व पहिल्या महायुद्धाने तर शेतीमालाला चांगलीच तेजी आली. तथापि युद्धोत्तर मात्र मंदीची लाट येऊन शेतकरी कर्जबाजारी झाले. राष्ट्रीय पातळीवर मदत व ‘न्यूडील’ धोरणाने थोडी उसंत मिळाली पण कृषिउत्पादनाला आर्थिक स्थैर्य लाभले ते दुसऱ्या महायुद्धामुळे. राज्याने दोन्ही महायुद्धांत मनुष्यबळाप्रमाणेच धान्यपुरवठाही भरपूर केला. १९४५ नंतर राज्यात सैनिकी दारूगोळ्याचे कारखाने व वायुसेनेची दोन मुख्य ठाणी, तसेच एक अणुशक्तिकेंद्र निघाले. स्वस्थ विद्युत्शक्ती, मुबलक जमीन व पाणी आणि कामगार यांच्या उपलब्धतेमुळे अनेक लघुद्योग या राज्यात वाढू लागले आहेत.
कृषी हा राज्याचा मुख्य उद्योग असून १९७० मध्ये किंमतीच्या दृष्टीने मका, घासचारा, गहु व सोरघम (ज्वारी) ही मुख्य पिके होती. गहु व पशुखाद्य म्हणून मका यांत राज्याचा क्रमांक देशात पाचवा, सोरघममध्ये तिसरा व साखर-बीट उत्पादनात सहावा होता. ओट, बटाटे, राय, सोयाबीन, बीट ही पिकेही काढण्यात येतात. १९७३ मध्ये राज्याचे सु. १९·४४ लक्ष हे. क्षेत्र ओलिताखाली होते व ४१,२६८ सिंचनविहिरी होत्या. १९७३ च्या सुरुवातीस राज्यात एकूण ७४,१०,००० पशुधन होते. त्यात १,६१,००० दुभत्या गाई ३,३०,००० मेंढ्या व ३४,६०,००० डुकरे होती. कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय हे उद्योग राज्यात महत्त्वाचे आहेत. घाऊक व किरकोळ व्यापारात सु. १९ टक्के लोक गुंतलेले आहेत. कारखानदारी मुख्यतः मांस संवेष्टन, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, रसायने, सिमेंट, शास्त्रीय उपकरणे, रेल्वेसामग्री, रबर, प्लॅस्टिक, घडीव धातू, माग, साखर, भाजलेली धान्ये व गुरांचे खाद्य यांची आहे. राज्याच्या पश्चिम भागात खनिज तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन हाते.
राज्याच्या मध्यवर्ती स्थानामुळे अनेक महामार्ग नेब्रॅस्कातून जात असून ‘आंतरराज्य महामार्ग क्र. ८०’ हा सर्वांत महत्त्वाचा मार्ग आहे. १९७३ मध्ये १५,६८६ किमी. राज्यरस्ते व १,४१,१४६ किमी. स्थानिक रस्ते होते. १९७४ मध्ये राज्यात ७,७८,००० मोटारी होत्या ओमाहा हे मिसूरीवरील महत्त्वाचे व्यापारी बंदर आहे. १९७२ मध्ये लोहमार्ग १२,३१७ किमी. असून १२७ सार्वजनिक व २१२ खाजगी विमानतळ ६० हून अधिक नभोवाणी केंद्रे व १४ दूरचित्रवाणी केंद्रे, ८ लाखांहून अधिक दूरध्वनियंत्रे, १८ दैनिके, ३२ इतर वर्तमानपत्रे व अनेक नियतकालिके होती.
शहरी व ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण १९७० मध्ये अनुक्रमे ६१·६ व ३८·४ टक्के होते. लोक जर्मन, स्वीडिश, डेन, बोहीमियन, रशियन आणि काही थोडे पोलिश, फ्रेंच, इंग्रज, आयरिश, इटालियन इ. असून १९७० मध्ये निग्रो सु. २·७ टक्के, व ६,६२४ इंडियन आणि ४,०९१ आशियाई होते. ख्रिस्ती धर्माचे अनेक पंथ येथे असून काही आदिवासी त्यांचे जुने धार्मिक विधी अद्याप पाळतात. राज्याची भाषा इंग्रजी असून राज्यात ७ ते १६ वर्षे वयाच्या मुलांस शिक्षण सक्तीचे व निःशुल्क आहे. १९७३ मध्ये प्राथमिक शाळांत १,७६,८२९ व माध्यामिक शाळांत १,४७,६९८ विद्यार्थी होते. उच्च शिक्षणाच्या २७ संस्थांतून ७१,२८५ विद्यार्थी होते. लिंकन येथे १८६९ मध्ये स्थापन झालेले नेब्रॅस्का विद्यापीठ असून त्याची दोन विद्यापीठ क्षेत्रे ओमाहा येथे आहेत. राज्याची आरोग्य परिस्थिती एकंदरीत समाधानकारक आहे. १९७४ मध्ये राज्यात १२१ रुग्णालये होती अाणि हेस्टिंग्ज, लिंकन व नॉरफॉक येथील मनोरुग्णालयांतील मनोरुग्णांची संख्या ६४५ होती. वृद्ध, अपंग वगैरे वैद्यकीय साहाय्याची आवश्यकता असणारे लोक, अवलंबी मुले असलेली कुटुंबे, बालकल्याण व पंगू मुलांस साहाय्य यांवर बराच शासकीय खर्च होतो. १९६९ च्या नागरी हक्कांच्या कायद्याप्रमाणे सर्व लोकांस विश्रामगृहे, उपहारगृहे, सार्वजनिक वाहने, करमणुकीच्या जागा वगैरे बाबतीत सारखाच लाभ घेता येतो. वंशभेद, वर्णभेद यांस बंदी आहे. राज्यात पाच वस्तुसंग्रहालये व एक कलावीथी आहे. राज्यात २६० हून अधिक सार्वजनिक ग्रंथालये असून नेब्रॅस्का विद्यापीठाचे ग्रंथालय सर्वांत मोठे आहे. स्त्रिया, मुलेमुली इत्यादींसाठी मार्गदर्शन केंद्रे व सुधारगृहे आहेत.
राज्यातील गोऱ्यांच्या मूळ जीवनाविषयी व आदिवासींच्या जीवनाविषयी काव्य, कथा, कादंबऱ्यादी लिहिणारे लेखक मान्यता पावले आहेत. नागरीकरण व सुबत्ता यांमुळे चित्रकला, नाट्य, संगीत इ. कलांची वाढ झाली आहे. काही ठिकाणी मूळचे यूरोपीय उत्सव साजरे होतात. नेब्रॅस्का विद्यापीठाचा फुटबॉल संघ देशात विख्यात आहे. त्या खेळाचे उत्पन्न राज्याला अनेक बाबतींत साहाय्यकारक ठरते.
प्रेक्षणीय स्थळे : ओमाहा हे राज्यातील सर्वांत मोठे शहर (लोकसंख्या ३,४६,९२९–१९७०) असून, रेल्वेसाहित्य निर्मितीचे व मोठे लोहमार्ग प्रस्थानक, दुसऱ्या क्रमांकाची गुरांची बाजारपेठ व प्रथम क्रमांकाचे मांस डबाबंद करण्याचे व लोणी उत्पादनाचे ठिकाण आहे. निराधार मुलांसाठी येथील बालनगरी (बॉइज-टाऊन) विख्यात आहे. लिंकन या राजधानीतील (१,४९,५१८) विधानमंडळाची इमारत सर्व देशात भव्य व प्रेक्षणीय असून हे मोठी धान्यपेठ व शिक्षण आणि विमाकेंद्र आहे. ग्रँड आयलंड–शेती व कारखानदारी मालाचे वितरण व अन्नप्रक्रिया केंद्र, हेस्टिंग्ज–धान्य व मांसप्रक्रिया आणि लघुउद्योग केंद्र, नॉर्थ प्लॅट–शेतमाल विक्रीकेंद्र आणि धान्य व गुरे यांच्या निर्यातीचे ठिकाण आहे.
ओक, शा. नि.
“