डिअरबॉर्न : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मिशिगन राज्यातील, डिट्रॉइटच्या पश्चिमेस १६ किमी.वर रुझ नदीतीरावरील औद्योगिक शहर डिट्रॉइटचे एक उपनगर. लोकसंख्या १,१२,००७ (१९७०). हेन्री फोर्डचे हे जन्मग्राम व फोर्ड मोटार कंपनीचे संशोधन-अभियांत्रिकी व फोर्ड मोटारनिर्मितीचे प्रधान केंद्र आहे. १७९५ मध्ये वसलेले हे शहर डिट्रॉइट–शिकागो मार्गावरील थांब्याचे ठिकाण म्हणून उदयास आले. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धातील एक प्रसिद्ध जनरल हेन्री डिअरबॉर्न याचे नाव या शहरास देण्यात आले. १९१७ मध्ये फोर्डने आपला मोटारनिर्मितीचा कारखाना येथे उभारल्यापासून शहराची औद्योगिक वाढ, झपाट्याने होऊ लागली. शहरात यंत्रसामग्री, विमानाचे सुटे भाग, कृषियंत्रे, शस्त्रास्त्रे, धातुपदार्थ इत्यादींचे दोनशेवर कारखाने आहेत. डिअरबॉर्नमध्ये मिशिगन विद्यापीठाची एक अध्ययनशाखा, हेन्री फोर्ड कम्यूनिटी महाविद्यालय, एडिसन संस्था, हेन्री फोर्ड ग्रंथालय, हेन्री फोर्ड संग्रहालय, फेअर लेन हे फोर्डचे जन्मगृह, डिअरबॉर्न ऐतिहासिक संग्रहालय इ. प्रसिद्ध शैक्षणिक व कलाविषयक वास्तू आहेत. डिअरबॉर्न येथे अमेरिकेतील पहिले बहुएंजिनांचे प्रवासी-वाहतूक करणारे विमान बांधले गेले, येथूनच देशातील हवाई टपालवाहतूकसेवा सुरू झाली आणि याच फोर्ड विमानतळावर प्रवासी वाहतूक करणारे विमान रेडिओ नियंत्रण व्यवस्थेने प्रथमच सुरक्षितपणे उतरविण्यात आले. 

गद्रे, वि. रा.