कानेरी बेटे : अटलांटिक महासागरातील, अफ्रिकेच्या वायव्य किनाऱ्यापासून ९६ किमी अंतरावरील, स्पेनच्या आधिपत्याखाली सु. १३ बेटे. २७ ३७’ उ. ते २९ २४’ उ. आणि १३ २५’ प. ते १८ १०’ प. क्षेत्रफळ ७,२७३ चौ. किमी. लोकसंख्या ११,७०,२२४ (१९७०). ही बेटे स्पेनच्या नैर्ऋत्येय १,३१७ किमी. असून तेनेरीफ, पाल्मा, गोमेरा व येरॉ या बेटांचा सांताक्रूझ द तेनेरीफ हा प्रांत आणि फ्वेर्तेर्व्हेतूरा, लांथारोते, लास पाल्मास व ग्रान कानेरीया बेटांचा पाल्मास प्रांत बनविण्यात आला आहे. ही बेटे ज्वालामुखीपासून बनलेली असून प्यूमिस, मीठ, गंधक व थोडे फार लोहधातुक ही खनिजे येथे सापडतात. तेनेरीफ सर्वांत मोठे बेट असून त्यावरील तेइदे शिखर (३,७०६ मी.) सर्वांत उंच आहे. बहुतेक बेटे डोंगराळ व जंगलमय आहेत. बेटांवर आढळणाऱ्या एकूण ९०० सपुष्प वनस्पतींपैकी ३० जाती फक्त कानेरी बेटांवरच आढळतात. येथील सरासरी तपमान २२ से. व पर्जन्य ३०-४० सेंमी. असून केळी, टोमॅटो, बटाटे, कांदे, तंबाखू ही येथील प्रमुख पीके होत. पूर्वी येथील द्राक्षांपासून बनविलेली दारू प्रसिद्ध होती त्याचप्रमाणे ऊस आणि नीळ यांचे उत्पन्नही मोठे होते. तेनेरीफ, लास, पाल्मास, बालव्हेर्दे ही यांवरील प्रमुख शहरे असून, मच्छीमारी व बोटींच्या जाण्यायेण्याच्या मार्गावरील विश्रामस्थाने म्हणून प्रसिद्ध आहेत. इसवी सनापूर्वी प्लिनीने या बेटांचा उल्लेख केला असून मध्य युगात यांना `फॉर्चून’ बेटे म्हणत. १३४१ मध्ये पोर्तुगालने त्यांवर आपला हक्क सांगितला, पण पोपने ही बेटे स्पेनला दिली व त्यास १४७९ मध्ये पोर्तुगालनेही मान्यता दिली. स्पॅनिश लोकांपूर्वी येथे `ग्वांचे’ लोक रहात ते आता जवळजवळ नामशेष झाले असले, तरी शीळ वाजवून बोलली जाणारी त्यांची भाषा गोमेरा बेटावर प्रचलित आहे. जनरल फ्रांकोची क्रांती कानेरी बेटांपासूनच सुरू झाली. आफ्रिकेतील वसाहतींवर नजर ठेवण्यासाठी स्पेनला कानेरी बेटांचा चांगला उपयोग होई.

डिसुझा, आ.रे.