तस्कनी : (इटालियन तोस्काना). मध्य इटलीचा एक इतिहासप्रसिद्ध शासकीय विभाग. क्षेत्रफळ २२,९९२ चौ. किमी. लोकसंख्या ३५,०२,३६२ (१९७२). याच्या उत्तरेला एमील्या व रोम विभाग, पूर्वेला मार्चेझ आणि अंब्रिया विभाग, दक्षिणेला लेशियम विभाग आणि टिरीनियम समुद्र, पश्चिमेला लिग्यूरिया विभाग आणि लिम्यूरियनचा समुद्र आहे. फ्लॉरेन्स ही या विभागाची राजधानी असून लीव्हॉर्‌नॉ (लेगहॉर्न) हे मुख्य बंदर आहे.

या विभागात आरेत्सो, फ्लॉरेन्स(फीरेंत्से), ग्रॉसेटॉ, लीव्हॉर्‌नॉ, लूका, मास्सा ए कार्‌रारा, पीसा, पीस्तॉया व सिएना या नऊ प्रांतांचा समावेश होतो. यांशिवाय तस्कनी द्वीपसमुहातील सर्व म्हणजे एल्बा, गॉरगॉना, काप्राया प्यानॉझा, माँटी क्रीस्टो, जील्यो आणि जाननुत्री याच विभागात समाविष्ट आहेत. यात एल्बा सर्वांत मोठे आहे.

या विभागाचा ९० टक्के प्रदेश डोंगराळ असून तो दक्षिणेकडे जाणाऱ्या ॲपेनाइन्स रांगेने आणि इतर लहान रांगा व डोंगरांनी व्यापला आहे. पश्चिमेकडील मारेम्मा किनारपट्टी व आर्नोचे खोरे हा भाग मात्र सखल आहे. आर्नो, सेर्‌क्यॉ, चेअचिना व ओंब्राने या प्रमुख नद्या आहेत.

येथील हवामान सामान्यतः सम व दमट आहे. पाऊस प्रामुख्याने हिवाळ्यात पडतो. उन्हाळे विशेषतः किनारी भागात कोरडे जातात. फ्लॉरेन्सला पर्जन्य ८५ सेंमी. आहे व डोंगराळ भागातील कामाल्डॉली येथे तो १८० सेंमी. आहे. उत्तरेकडील डोंगरामुळे तीव्र थंडीचे वारे अडविले जातात. डोंगराळ भागात मात्र हिवाळ्यात हिमवृष्टी होते. या विभागाचा ३६%  भाग अरण्यांनी व्यापला आहे. त्यात चेस्टनटचे प्रमाण जास्त आहे. येथे कुरणे फार मर्यादित असली तरी गुरे, मेंढ्या, घोडे, डुक्करे, कोंबड्या यांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. सपाट प्रदेशात गहू, मका, ओट, राय, बीट, तंबाखू यांची शेती होते. उतारांवर द्राक्षे, ऑलिव्ह यांचे मळे व फुलबागा आढळतात. तस्कनीतील क्यांती व माँते पूलचानॉ येथील मद्ये प्रसिद्ध आहेत. किनाऱ्यावर बारमहा मासेमारी चालते. किनारी प्रदेशात अनारोग्यकारक दलदली आहेत. त्यांपैकी बऱ्याच हटविल्या जात आहेत.

येथे अनेक खनिजे आहेत. त्यांत लोह ९०% एल्बा येथे मिळते. तेथील लोहधातुकाचा साठा कमी होत असला तरी तेथे शिसे, जस्त, अ‍ँटिमनी, पारा, तांबे, पायराइट सापडतात. पारा माँते आम्याता येथे बोरिक अम्ल मारेम्मातील लार्देरेल्लॉ येथील उष्णोदकाच्या झऱ्यांपासून व्होल्टेरा येथे मीठ, तांबे गाव्हॉररानॉ येथे मॅंगॅनीज माँते अर्जेंताऱ्यो येथे मॅग्नेसाइट व लिग्नाइट कोळसा अनुक्रमे व्हॅल दे आर्नो (आर्नो खोरे) आणि गाव्हॉररानॉ येथे तर उत्तम प्रकारचा संगमरवर मास्सा ए कर्‌रारा येथे मिळतो.

या सर्व साधनसंपत्तीमुळे येथे धातू, रसायने आणि कापड हे प्रमुख उद्योग आढळतात. कारखान्यांस लागणारी निम्मी वीज जलविद्युत तर निम्मी औष्णिक आहे. लोह–पोलादाचा उपयोग एल्बा, प्योमबिनो, पॉर्तोफारायो आणि फ्लॉरेन्स येथे आहे. लेगहॉर्नमध्ये जहाजबांधणीचा उद्योग आहे. पीसा आणि एम्पोली येथे काच कारखाने आहेत. प्रातॉ आणि लूका येथे कापड उद्योग असून कासीनॉ येथे फर्निचर तयार होते. फ्लॉरेन्स हे औद्योगिक दृष्ट्या फार महत्त्वाचे असून तेथे पोलाद व पोलादी वस्तू, कापड, कपडे, फर्निचर, कलाकुसरीच्या, शोभेच्या व भूषा वस्तू तयार होतात. इतरत्र काचेची व चिनी मातीची भांडी, लाकडी आणि चामडी वस्तू, हॅट, टोपल्या, खेळणी, कलाकुसरीच्या वस्तू तयार होतात. पर्यटन व्यवसायही महत्त्वाचा आहे. डोंगरात आणि किनारपट्टीवर औषधीयुक्त उष्ण पाण्याचे अनेक झरे आहेत. तेथे पुष्कळ पर्यटक मुद्दाम जातात. येथे सर्व प्रकारची वाहतूक चालते. त्यात नेपल्स–मिलान हा लोहमार्ग फार वेगवान आहे, तर फ्लॉरेन्स–बोलोन्या मार्गावर ३७ बोगदे आहेत. फ्लॉरेन्सहून समुद्रापर्यंत जाणारा ऑटोस्ट्राज हा महामार्ग पीस्तॉया आणि लूकावरून जातो. चांगल्या सडकांचे जाळे सर्व विभागभर आहे. अनेक लहानमोठ्या बंदरांतून जहाजे जा–ये करतात. लिग्यूरियन समुद्रावरील लेगहॉर्न हे सर्वांत मोठे बंदर आहे. फ्लॉरेन्स येथे मोठा विमानतळ आहे.

इ. स. पू. १००० च्या सुमारास येथे स्थायिक झालेल्या इट्रुस्कन टोळीवरून तस्कनी हे नाव पडले. इ. स. पू. तिसऱ्या शतकात हा भाग रोमन साम्राज्यात होता. गॉथ, बायझंटिन, लाँबर्डी, फ्रँक यांच्या सत्तांनंतर विशेषतः पोप ग्रेगरी सातवा याची बाजू घेणारी अटोनी कुळातील माटिल्डा हिच्यानंतर एकी नष्ट होऊन एकेक शहर स्वतंत्र होत गेले. त्यांच्या आपापसात लढाया झाल्या. प्रबोधन काळात हा भाग शिक्षण आणि कलेचे केंद्र होता. माराया टेरीसाचा पुत्र दुसरा लिओपोल्ड याने अनेक राजकीय सुधारणा व आर्थिक विकास केला. नेपोलियनची सत्ताही काही काळ होती. त्यानंतर अनेक घडामोडी होऊन १८६१ मध्ये हा भाग इटलीच्या राज्यात विलीन झाला. दुसऱ्या महायुद्धात या भागात अनेक लढाया आणि हवाई हल्ले झाले. यांतून फारच थोडी शहरे बचावली.

पाठक, सु. पुं.