प्रेस्कट : अमेरिकेच्या ॲरिझोना राज्याच्या याव्हपाय काउंटीची राजधानी. लोकसंख्या १३,०३० (१९७०). हे फीनिक्सच्या वायव्येस सु. १३० किमी.वर वसले आहे. आरोग्यस्थान म्हणून ते विशेष प्रसिद्ध आहे.

याच्या परिसरात १८६३ मध्ये सोन्याचा शोध लागला व पुढल्याच वर्षी ह्रिपल या किल्ल्यानजीक हे शहर उभे राहिले. त्यास विल्यम हिकलिंग प्रेस्कट (१७९६-१८५९) या अमेरिकन इतिहासकाराच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले. येथे १८६४ ते १८६७ व १८७७ ते १८८९ या कालावधीत ॲरिझोना प्रदेशाची राजधानी होती.

प्रेस्कटचा परिसर कृषिव्यवसायाने विकसित झालेला असून सोने, चांदी, तांबे, जस्त इ. खनिजांना समृद्ध आहे. ‘प्रेस्कट नॅशनल फॉरेस्ट’ चे येथे मुख्यालय आहे. येथे ‘फ्रंटिअर डेज रोडीओ’ हा गुराख्यांचा (काउ-बॉय) क्रीडोत्सव १८८८ पासून दरवर्षी जुलैमध्ये साजरा केला जातो. येथील ‘शार्लट हॉल म्यूझीयम’, ‘स्मोकी इंडियन म्यूझीयम’ इ. वस्तुसंग्रहालये प्रेक्षणीय आहेत.

लिमये, दि. ह.