रक्षौल : बिहार राज्यातील चंपारण्य जिल्ह्याच्या ईशान्य भागातील, भारत–नेपाळ सरहद्दीवरील एक ठिकाण. लोकसंख्या (रक्षौल बझार) २०,४०९ (१९८१). भारत−नेपाळ यांच्या सरहद्दीवर असल्यामुळे राजकीय तसेच आंतरराष्ट्रीय दृष्टींनी रक्षौलला महत्त्वाचे स्थान आहे. रक्षौल हे ‘नेपाळचे प्रवेशद्वार’ म्हणून एळखले जाते. १९५५ मध्ये पूर्वीच्या ‘संयुक्त मंडळा’ ऐवजी (युनियन बोर्ड) ‘रक्षौल अधिसूचित क्षेत्र समिती’ ची स्थापना करण्यात आली. या समितीच्या ताब्यात रक्षौलचा ९·२७ चौ.किमी. प्रदेश आहे. नेपाळमधील ‘बारा’ जिल्ह्याचे मुख्य ठाणे ‘वीरगंज’ हे नेपाळ सरहद्दीपासून आत केवळ तीन-चार किमी. अंतरावर आहे. सुगौली ते रक्षौल व नारकोठीया ते समस्तीपूर हे दोन्ही लोहमार्ग रक्षौलजवळ एकमेकांस मिळतात. नेपाळ रेल्वेचा आमलेखगंज (नेपाळमधील एक गाव) कडे जाणारा फाटा येथूनच सुरू होते. रक्षौल हे रस्त्यांनी इतर मोक्याच्या ठिकाणांशी जोडलेले आहे. मुझफरपूर−रक्षौल या हमरस्त्यामुळे रक्षौलचे महत्त्व अधिकच वाढत आहे. दररोज हजारो प्रवासी येथून नेपाळकडे जातात. नगराची सुबक रचना करण्यात आली आहे. परदेशी प्रवाशांना आकर्षून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काठमांडू−रक्षौल रस्ता खुला करण्यात आल्यामुळे तसेच छोटेखानी नेपाळ लोहमार्गाचे रुंदमापी लोहमार्गात रूपांतर करण्यात आल्यामुळे रक्षौलच्या विकासास मदत झाली आहे. परदेशी प्रवाशांमुळे येथील व्यापार वाढत आहे. मुख्यतः मारवाडी लोक या व्यवसायात अधिक आढळतात. धान्य, सिगारेटी व लाकूड यांचा येथे मोठा व्यापार चालतो. भातसडीच्या गिरण्या बऱ्याच आहेत. येथे डाक व तार घर, दूरध्वनी कार्यालय, चित्रपटगृह, मिशनचे सुसज्ज रुग्णालय, माध्यमिक शाळा, विमानतळ इ. सुविधा आहेत.

चौधरी, वसंत