गारो–१ : भारताच्या मेघालय पठारी प्रदेशाचा पश्चिम भाग. क्षेत्रफळ सु. ८,१८० चौ. किमी. पठाराच्या इतर भागापेक्षा कमी उंचीचा, परंतु तसाच भरपूर पावसाचा व दाट अरण्यांचा हा डोंगराळ प्रदेश बहुतांशी मेघालय राज्याचा ४,०६,६१५ (१९७१) लोकसंख्येचा गारो टेकड्या जिल्हाच होय. याच्या तुरा रांगेत १,४१२ मी. उंचीचे नोक्रेक हे सर्वोच्च शिखर आहे. दुहेरी विभंगरेषांमधील या गटपर्वत प्रदेशाच्या उत्तर विभंगरेषेवरून वाहणारी सिमसँग नदी तुरा आणि कैलास रांगांमधून दक्षिणेकडील सुरमा खोऱ्यात सोमेश्वरी म्हणून येते. पश्चिमवाहिनी ब्रह्मपुत्रा गारोच्या पश्चिमेस दक्षिणवाहिनी होते. येथे थोडा कोळसा, चुनखडी व अलीकडे खनिज तेल सापडते. गारो टोळीवाल्यांवरून या प्रदेशाला गारो नाव मिळाले आहे. गारो टोळीवाले नद्यांकाठी खांबांवर उभारलेल्या झोपड्यांतून राहणारे, पटाईत मच्छीमार, फिरती शेती करणारे, मातृसत्ताक कुटुंबपद्धतीचे, जडप्राणवादी, पूर्वजपूजा करणारे, मागासलेले आहेत. अलीकडे बरेच लोक ख्रिस्ती झाले आहेत. जिल्ह्यातील सु. ८५·४४% लोक शेती करतात. भात, कापूस, मोहरी, ताग, तंबाखू, ऊस ही पिके आहेत. २२% लोक साक्षर आहेत. १५,४८९ वस्तीचे तुरा हे येथील मुख्य ठाणे आहे.                   

कुमठेकर, ज. ब.